बॉलिवुडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. प्रदर्शित झाल्यावर तर या चित्रपटाला बहुतांश प्रेक्षकांनी बॉयकॉट केलं आहे. आता नुकतंच आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने सोशल मीडियावर एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. चित्रपटाला बॉयकॉट केल्यासंदर्भात आमिर आपली समस्या घेऊन राज ठाकरे यांच्याकडे आला असल्याचे तर्क नेटकरी लावत आहेत.

आमिरने आज संध्याकाळी ४ वाजता राज यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ येथे हजेरी लावली. तब्बल १ तास आमिर आणि राज ठाकरे यांच्यात बोलणी सुरू होती. राज ठाकरे नवीन घरात राहायला आल्यापासून त्यांच्या घरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.

आणखीन वाचा : “आमिर खान कधीच बॉयकॉट होऊ शकत नाही कारण…” ‘लाल सिंग चड्ढा’बाबत स्पष्टच बोलली एकता कपूर

राज ठाकरे यांच्यावर मध्यंतरी शस्त्रक्रिया झाली होती. याबद्दल त्यांनी भर सभेतही सांगितलं होतं. आमिर खानने राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवतीर्थ येथे जाऊन भेट घेतली आहे अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर मात्र याविषयी वेगळीच चर्चा सुरू आहे. आमिरच्या चित्रपटाला बॉयकॉटचा सामाना करावा लागल्याने त्याचा चित्रपट सपशेल आपटला आहे. यासाठीच आमिर राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायला गेला असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत.

राज ठाकरे यांचे चित्रपट क्षेत्राशी निगडीत सगळ्याच लोकांशी अगदी सलोख्याचे संबंध आहे. मध्यंतरी ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या प्रदर्शनादरम्यान मराठी आणि हिंदी चित्रपटांना मिळणाऱ्या स्क्रीन्सवरुन वाद निर्माण झाला होता. त्यावेळेस खुद्द राज ठाकरे यांनी मध्यस्थी केली होती. तेव्हासुद्धा शाहरुख खान, रोहित शेट्टी यासारख्या बड्या लोकांनी राज यांची भेट घेऊन या वादावर तोडगा काढला होता. इतकंच नाही तर पाकिस्तानी कलाकारांच्या अरेरावी विरोधातही प्रथम राज ठाकरे यांच्या मनसेनेच आवाज उठवला होता.