पुरस्कार… हे कोणत्याही कलाकारासाठी त्याच्या कामाची पोचपावती असतात. त्यामुळे प्रत्येक कलाकार करत आपल्यालासुद्धा पुरस्कार मिळावेत अशी अपेक्षा करत असतो. मात्र अनेकदा काम आणि कष्ट करूनही हे पुरस्कार मिळत नाहीत, तेव्हा कलाकाराला नक्कीच वाईट वाटतं आणि पुरस्कार न मिळण्याबद्दलची खंतही वाटते. अलीकडे पुरस्कार न मिळण्याबद्दल कलाकार त्यांची खंत स्पष्टपणे व्यक्त करताना दिसतात.
अशीच खंत एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीही व्यक्त केली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे आरती सोळंकी. अनेक विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तसंच ‘बिग बॉस मराठी’ सारख्या शोमध्ये झळकलेली आरती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिचे अनेक अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. अशातच तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये आरती असं म्हणते, “ज्यांची स्वत:ची कुवत, कर्तुत्व, अभिनयाची योग्यता, कलेची जान, लिखाणामधली समज, दिग्दर्शनाची जाण अशा गोष्टीशी काही संबंध नाही अशा मूर्ख लोकांना १५० रुपयांची ट्रॉफी. कैलासवासी स्मिता पाटील यांच्या नावाने मलासुद्धा पुरस्कार देऊन सत्कार करावा. कारण सध्या कर्तृत्व आणि योग्यता नसणाऱ्यांना ट्रॉफी दिली जाते; तर ती मला सुद्धा हवी आहे.”
यापुढे तिने कॅप्श्नमध्ये असं म्हटलंय, “स्मिता ताई तुम्ही ग्रेट आहात. तुमची जागा कोणीही घेऊन शकत नाही. मला माफ करा. पण आजची परिस्थिती खूप वाईट आहे. आपली मराठी रंगभूमी ज्या ज्या ज्येष्ठ कलाकारांनी गाजवली आहे. आज त्यांच्या नावाने कुणालाही पुरस्कार देण्यात येतोय. फक्त मी मुलगी आहे म्हणून तुमचं उदाहरण दिलंय. मला माफ करा.” आरतीची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
आरतीने या पोस्टमधून कर्तृत्व आणि योग्यता नसणाऱ्यांना पुरस्काराच्या ट्रॉफी मिळणाऱ्यांबद्दल तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पोस्टमधून तिचा रोख नक्की कुणाकडे आहे हे स्पष्ट केलेलं नाही. तिने या पोस्टमध्ये कुणाचंही नाव न घेता तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये आरतीच्या या पोस्टबद्दल चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आरतीबद्दल सांगायचं, तर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अनेक रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली आहे. तिने ‘४ इडियट्स’, ‘येड्यांची जत्रा’, ‘वाजलंच पाहिजे’ आणि ‘लूज कंट्रोल’ या चित्रपटांत काम केले आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतही ती दिसली होती. तसंच ‘ढोलकीच्या तालावर’ या शोमध्येही ती सहभागी झाली होती