मूळ कलाकृतींच्या शोधात नवमाध्यमे..

गेल्या वर्षभरात भारतात सशुल्क ओटीटी वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत २५ ते ३० टक्के  वाढ झाली आहे.

रेश्मा राईकवार

वर्षभरापूर्वी करोनाचे संकट ओढवण्याआधी घराघरांतील प्रेक्षक हा टेलीव्हिजन सेटवर दिसणाऱ्या मालिका आणि चित्रपटांमध्येच रमलेला होता. एखादा भारी चित्रपट आला की तो चित्रपटगृहात जाऊन बघायचा.. तोवर तुझ्याकडे आला का? मग मला शेअर कर ना.. हा ट्रेनपासून कार्यालयांपर्यंतचा शिरस्ता बिनबोभाट सुरू होता. कधी तरी कोणी तरी नेटफ्लिक्स किं वा अ‍ॅमेझॉन प्राइमवरील ‘सेक्रेड गेम्स’ किंवा ‘मिर्झापूर’बद्दल बोलताना दिसे. आता हेच चित्र अगदी उलटं झालं आहे. टाळेबंदी आली, नव्या चित्रीकरणांवर बंदी आली, मालिकांचा रोजचा राबता थांबला, चित्रपटातील तारेही घरकामात व्यग्र झाले. तेव्हा या सगळ्या गोंधळात फक्त एकाच ठिकाणी नवीन काही तरी पाहायला मिळण्याची संधी होती ती म्हणजे हातातील मोबाइल. या मोबाइलवर ‘ओव्हर द टॉप’ ओटीटी नामक वाहिन्यांवर आत्तापर्यंत न पाहिलेल्या वेबमालिका आणि चित्रपटांसह नव्याने येणारा आशयही मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. गेल्या वर्षभराच्या काळात मोजक्या दोन वाहिन्यांपासून सुरू झालेला ओटीटी वाहिन्यांचा प्रवास आता ४० ओटीटी वाहिन्या आणि त्यांच्या शुल्कापोटी जमा झालेले अब्जावधींचे उत्पन्न इथपर्यंत येऊन ठेपला आहे. वर्षभरात ओटीटी क्षेत्राची झालेली वाढ पाहता हा वेग टिकवून ठेवण्यासाठी या वर्षी सशुल्क प्रेक्षकसंख्या वाढवणं आणि त्यासाठी मूळ आशयनिर्मितीचे आव्हान ओटीटी वाहिन्यांसमोर असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

२०२० मध्ये मार्च महिन्यात टाळेबंदी आल्यानंतर एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ओटीटी वाहिन्यांचा प्रेक्षक वाढला, परिणामी उत्पन्नात ३१ टक्क्यांनी वाढ झाली होती. ही वाढ तात्पुरती आहे का? हा विचार करण्यास अवकाशही न देता नवनवीन ओटीटी वाहिन्या, वेबमालिका यांची भर पडत गेली. सप्टेंबरपासून टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरळीत झाले आणि टीव्हीची दुनिया नेहमीसारखी गजबजली. अगदी रखडलेले चित्रपटही आता हळूहळू चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ लागले आहेत आणि तरीही ओटीटी माध्यमांचा विस्तार आणि त्यांची भरभराट थांबलेली नाही, उलट आता या माध्यमांमध्ये स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत एकीकडे ‘नेटफ्लिक्स’सारखी पूर्णपणे परदेशी ओटीटी वाहिनीही आहे, तर दुसरीकडे ‘झी ५’, ‘अल्ट बालाजी’, ‘मॅक्स प्लेअर’ यांच्यासह ‘हॉटस्टार’, ‘लायन्सगेट प्ले’सारख्या देशी-परदेशी संयुक्त व्यवसाय सांभाळणाऱ्या वाहिन्याही आहेत. मात्र वाहिन्यांची मुळं कु ठलीही असली तरी सध्या भारतीय प्रेक्षकांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी हिंदीसह प्रादेशिक आशयनिर्मितीवर भर द्यावा लागणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

‘‘गेल्या वर्षभरात भारतात सशुल्क ओटीटी वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत २५ ते ३० टक्के  वाढ झाली आहे. सध्या देशभरात ४ ते ५ कोटी सशुल्क वाहिन्या पाहणारे प्रेक्षक आहेत. कोणत्या ना कोणत्या ओटीटी वाहिन्यांशी हा प्रेक्षक जोडला गेलेला आहे आणि ही प्रेक्षकसंख्या वाढतच चालली आहे,’’ अशी माहिती ऑरमॅक्स मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश कपूर यांनी दिली. ‘अल्ट बालाजी’च्या मार्के टिंग विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष दिव्या दीक्षित यांनीही या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार अल्ट बालाजीच्या प्रेक्षकसंख्येत मोठय़ा संख्येने वाढ झाली असल्याची माहिती दिली. दिवसाला २० ते २२ हजार एवढी सशुल्क वाहिनी पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढत असल्याची माहिती दिव्या यांनी दिली. करोनाकाळात ओटीटी वाहिन्यांचा भारतीय बाजारपेठेतील विस्तार इतका मोठा आहे की, सध्या या वाहिन्यांच्या शुल्कापोटी जमा होणाऱ्या उत्पन्नाची रक्कम १९ अब्ज एवढी असून पुढच्या वर्षीपर्यंत हा आकडा दुपटीपेक्षा जास्त असेल, असा अंदाज वर्तवला जातो आहे.

ओटीटी प्लॅटफॉम्र्सचा भारतातील विस्तार लक्षात घेत गेल्या वर्षी स्वतंत्रपणे काही कं पन्या या बाजारपेठेत उतरल्या, ‘लायन्सगेट प्ले’ ही त्यापैकीच एक. ‘‘गेल्या वर्षी आम्ही आमची स्वतंत्र ओटीटी वाहिनी सुरू के ली. आम्हाला थोडय़ाच कालावधीत भरभरून प्रतिसाद मिळाला. चांगला, दर्जेदार आशय पाहण्यासाठी प्रेक्षक पैसे मोजायला तयार आहेत हेही आमच्या लक्षात आलं. यंदाही करोनाचे सावट असले तरी आमची प्रेक्षकसंख्या घटणार नाही. त्यासाठी हॉलीवूड चित्रपटांबरोबरच भारतीय आशयनिर्मितीवरही आम्ही भर देत असून दर आठवडय़ाला नवीन आशय आमच्याकडून प्रेक्षकांना उपलब्ध होत राहील,’’ अशी माहिती ‘लायन्सगेट’चे कार्यकारी अध्यक्ष अमित धानुका यांनी दिली. गावागावांत पोहोचलेले मोबाइल आणि स्वस्त इंटरनेट डेटा यामुळे निमशहरी आणि ग्रामीण भागांत या वर्षी ओटीटीची प्रेक्षकसंख्या वेगाने वाढत चालली आसल्याची माहिती धानुका यांनी दिली. या प्रेक्षकांसाठी भारतीय आशयनिर्मिती महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट के ले. तर ‘अल्ट बालाजी’वरही ग्रामीण तसेच निमशहरी भागातील प्रेक्षकसंख्या जवळपास ५९ टक्के  एवढी असून या हिंदी प्रेक्षकांसाठी आशयनिर्मिती करण्यावर जोर दिला जात असल्याचे दिव्या दीक्षित यांनी सांगितले.

ओटीटी वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या आणि उत्पन्न दोन्ही वाढते असल्याने या वर्षी एकू णच इंडस्ट्रीची उलाढाल चांगली होईल, असा होरा असला तरी त्यासाठी देशभरातील कु ठल्या कु ठल्या भागात प्रेक्षकसंख्या जास्त आहे याची चाचपणी करणं आणि त्या त्या प्रेक्षकांना आवडेल असा आशय देणं हे ओटीटी कं पन्यांसाठी या वर्षी महत्त्वाचं ठरणार असल्याचं ट्रेड विश्लेषक सांगतात. ओमिडियाच्या सर्वेक्षणानुसार २०२१ ते २०२५ या कालावधीत मूळ किं वा भारतीय आशयनिर्मितीसाठी जवळपास ३० हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक के ली जाणार आहे. यात नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइमसारख्या कं पन्यांचा वाटा मोठा असला तरी भारतीय ओटीटी कं पन्या ५५ टक्के  गुंतवणूक करतील. पुढच्या पाच वर्षांत दरवर्षी हजार वेबमालिका-चित्रपटांची निर्मिती के ली जाणार असून या वर्षी कमीत कमी ४०० भारतीय आशय असलेल्या मालिका-चित्रपट प्रदर्शित होतील, असा अंदाज ओमिडियाने वर्तवला आहे. कु टुंबात एकत्रितरीत्या ओटीटीवरील वेबमालिका पाहण्याचा ट्रेण्डही रुळत चालला आहे. या बदलाचा सकारात्मक परिणाम ओटीटी कं पन्यांच्या भारतीय बाजारपेठेवर होत असल्याचाही एक मतप्रवाह इंडस्ट्रीतील धुरीणांमध्ये आहे. ऑरमॅक्स मीडियाच्या शैलैश कपूर यांच्या मते के वळ ओटीटीच नव्हे तर येत्या काळात यूटय़ूबसह इतर विनामूल्य ऑनलाइन प्लॅटफॉम्र्सच्या प्रेक्षकसंख्येतही १५ ते २० टक्के  वाढ होणार आहे. एकीकडे शुल्क भरून ओटीटी वाहिन्या पाहणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी अजूनही शुल्क न भरता वेबआशय पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यांना सशुल्क वाहिन्यांकडे वळवणे हेही ओटीटी कं पन्यांसमोरचे आव्हान आहे, असे कपूर यांनी स्पष्ट के ले. प्रादेशिक आशयनिर्मिती, हिंदी वेबमालिका आणि देशभरातील विविध भागांचे प्रतिनिधित्व करता येईल अशा आशयाचे सादरीकरण करण्यावर कं पन्यांकडून भर दिला जातो आहे. मात्र अशा पद्धतीचा मूळ आशय उपलब्ध आहे हे ग्रामीण भागापासून शहरी भागातील आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या मार्के टिंग योजनांचा आधार कं पन्यांना घ्यावा लागेल, असे कपूर यांनी सांगितले, तर दर्जेदार आणि सर्व वयोगटांतील, स्तरांतील भारतीय प्रेक्षकांना आपल्याशी जोडून घेणारा आशय देण्यात सातत्य ठेवणाऱ्या कं पन्याच स्पर्धेत टिकू न राहतील, असे धानुका यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात नवमाध्यमे म्हणून मागून येऊन सध्या टॉपवर असलेल्या ओटीटी कंपन्यांची घोडदौड यापुढेही सुरूच राहील, यात कोणालाही शंका नाही. मात्र आशय जितका स्थानिक असेल तितकाच त्याचा विस्तार होत राहिल, असा विश्वास इंडस्ट्रीतील जाणकारांनी व्यक्त के ला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article about ott platforms viewership of ott platforms zws