Drugs Party Case : आर्यन खानच्या जामिनाचा सविस्तर आदेश आला समोर, चित्रपट निर्मात्याची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला…

बेकायदा कृत्य केल्याचा पुरावा आहे का हे पाहावे लागते, असे कोर्टाने या आदेशात म्हटले आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यनला अटक झाल्यानंतर तब्बल २८ दिवसांनी त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर आता याप्रकरणी मुंबई हायकोर्टाचा सविस्तर आदेश समोर आला आहे. आरोपीने हा गुन्हा करण्याची योजना आखली होती, हे स्पष्ट करणारा कोणताही पुरावा नसल्याचे हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांनी प्रतिक्रिया देत एनसीबीवर निशाणा साधला आहे.

मुंबई हायकोर्टाने दिलेल्या जामीन आदेशानुसार, आर्यन आणि अरबाज मर्चंट क्रूझवर स्वतंत्रपणे प्रवास करत होते. त्यांनी ड्रग्ज घेण्याची कोणतीही योजना आखल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच आर्यन खानच्या व्हाट्सअ‍ॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज, मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचे षडयंत्र रचल्याचं दिसून येत नाही”, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाने जामीन आदेशात दिली आहे. यामुळे आर्यनला दिलासा मिळाला आहे.

मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर चित्रपट निर्माते संजय गुप्ता ट्वीट करत एनसीबीवर निशाणा साधला आहे. संजय गुप्ता यांनी केलेल्या ट्वीटनुसार, “मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आर्यन खान निर्दोष होता आणि आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात त्याला जे भोगावे लागले, त्याच्या कुटुंबाला जे भोगावे लागले, त्याची भरपाई कोण देणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

२६ दिवसांनी जामीन मंजूर

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात होता. त्यानंतर ८ ऑक्टोबरला त्याची रवानगी आर्थररोड जेलमध्ये करण्यात आली. तब्बल २६ दिवस आर्यन खान तुरुंगात होता. शुक्रवारी २९ ऑक्टोबर जामीन मंजूर झाल्यानंतर शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी सुटका करण्यात आली. याप्रकरणी आर्यन खानसोबत सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांनाही जामीन मंजूर झाला आहे.

जामीन आदेशात नेमकं काय म्हटलंय?

षड्यंत्र रचल्याच्या मुद्द्याबाबत आर्यन आणि अन्य दोन आरोपींविरोधात केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) जे पुरावे सादर केले, त्यावरून या तिघांविरोधात षड्यंत्र रचल्याचा कुठलाही सकारात्मक पुरावा सकृद्दर्शनी दिसत नाही. आर्यनकडे कोणतेही अंमली पदार्थ सापडलेले नाही याबाबत दुमत नाही. शिवाय अरबाज आणि धमेचा यांच्याकडे अंमली पदार्थांचा बेकायदा साठा आढळला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प होते. अशा वेळी तिन्ही आरोपींनी षड्यंत्र रचल्याचा सकृद्दर्शनी पुरेसा पुरावा आहे का? आणि एनसीबी त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप ठेवू शकते का, हे तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी बेकायदा कृत्य केल्याचा पुरावा आहे का हे पाहावे लागते, असे कोर्टाने या आदेशात म्हटले आहे.

“अरबाज, मुनमुन यांनी…”; आर्यन खानच्या जामिनाशी संबंधित आदेशात महत्वपूर्ण माहिती

त्याचा विचार करता आरोपी केवळ क्रूझवरून प्रवास करत होते याचा अर्थ त्यांनी बेकायदा गुन्हा करण्याच्या हेतूने कट रचला, असा होत नाही. तसेच एनसीबीचे म्हणणे मान्य केले तरी त्यासाठी  आरोपींना एक वर्षाहून अधिक काळासाठी शिक्षा होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: As court says no positive evidence against aryan khan drugs party case sanjay gupta asks who will compensate nrp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या