‘देवसेने’च्या रुपात प्रेक्षकांची मनं जिंकणारी दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी लवकरच ‘भागमती’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तिच्या याच चित्रपटाच्या चर्चा कलाविश्वात पाहायला मिळत आहेत. अनुष्काच्या या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरने अनेकांचेच लक्ष वेधले असून, एका खास व्यक्तीने हा ट्रेलर पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती खास व्यक्ती म्हणजे अभिनेता प्रभास.

‘भागमती’च्या ट्रेलरविषयी प्रभासने केलेल्या एका पोस्टमुळे सध्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. अनुष्का शेट्टी आणि प्रभास एकमेकांना डेट करत असून लवकरच ते लग्नही करतील अशा चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. या दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. पण, तरीही प्रभासने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे त्यांच्या नात्याविषयी रंगणाऱ्या चर्चांवर अनेकांचाच विश्वास बसत आहे, असे म्हणायला हरकत नाही. प्रभासने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन अनुष्काच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मेहनत आणि समर्पक वृत्तीने केलेल्या कामाचे हे प्रतीक आहे. या चित्रपटासाठी स्वीटी, अशोक आणि संपूर्ण टीमला खुप साऱ्या शुभेच्छा’, अशी पोस्ट त्याने केली. या पोस्टमध्ये ‘स्वीटी’ कोण, असा प्रश्न तुमच्या मनात घर करत असेल, तर त्याचे उत्तर आहे अनुष्का शेट्टी. अनुष्का ‘स्वीटी’ या नावानेही ओळखली जाते. त्यातही प्रभासने तिला शुभेच्छा दिल्या असल्यामुळे आता त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

वाचा : पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

‘बाहुबली २’ नंतर अनुष्का थेट ‘भागमती’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहता प्रेक्षकांना एका दमदार कथानकाची आणि त्याच ताकदीच्या अभिनयाची झलक पाहता येणार असा अंदाज वर्तवण्यात येतोय. जी. अशोक दिग्दर्शित ‘भागमती’मध्ये उन्नी मुकुंदन आणि आदी पिनिसेट्टी कलाकारही दिसतील. मल्याळम अभिनेता जयरामदेखील या चित्रपटातून झळकणार आहे. तेलगू, तमिळ आणि मल्याळम या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणारा अनुष्काचा हा चित्रपट एक हॉरर थ्रिलर असून, २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बाहुबली’मुळे मिळालेली लोकप्रिय आणि अनुष्काच्या चाहत्यांचा वाढलेला आकडा या गोष्टींचाही ‘भागमती’ला फायदा होणार हे नाकारता येणार नाही.