छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस मराठी’ चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. लवकरच आपण आपल्या आवडत्या कलाकारांना बिग बॉसच्या घरात आपले मनोरंजन करताना पाहणार आहोत. वेळोवेळी त्यांचा क्लास घ्यायला, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश  मांजरेकर विकएण्डला येत होते. या खास भागांना ‘विकेण्डचा डाव’,असे नावं दिले गेले होते. मात्र यंदाच्या सिझनमध्ये विकेण्डचा डाव नाही तर ‘बिग बॉसची चावडी’ असे नाव देण्यात आले आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या विकेण्डच्या भागात सूत्रसंचालक महेश मांजरेकरांचा अनेकदा पारा चढला आहे. स्पर्धकांच्या चुकीमुळे ते अनेकदा त्यांना ओरडले आहेत. मात्र यंदा थोडं वेगळं असणार आहे. अलीकडेच महेश यांच्या मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते, मात्र तरीही ते जिद्दीने बिग बॉस मराठीच्या सूत्रसांचालनाची डोलारा सांभाळताना दिसतील. एका पत्रकार परिषदेच्या वेळेस त्यांनी बिग बॉससाठी त्यांची यंदाची  योजना काय आहे हे सांगितले आहे. महेश मांजरेकर यांनी पत्रकर परिषदेत या विषयी सांगितले की, ” मी खेळात खुप गुंतून जातो, मात्र यंदा मी खुप सरळ वागणार आहे. मी जास्त गुंतणार नाही, कारण मी आता माझे १०० % देऊ शकत नाही. मला डॉक्टरांनी १०० % काम करायला परवानगी दिली नाही आहे. त्यामुळे मी जास्त चिडचिड नाही करणार.”

‘बिग बॉस मराठी सिझन ३’ च्या प्रोमो शूटच्या दरम्यान महेश मांजरेकर यांचे नुकतेच ऑपरेशन झाले होते, मात्र तरीही त्यांनी या शो चा प्रोमो शूट केला. जेव्हा ते या शोचा पहिला प्रोमो शूट करत होते, तेव्हा त्यांना वेदना झाल्या होत्या. इतकेच नाही तर शरीरात अनेक ठिकाणी नळ्या लावलेल्या होत्या, असे त्यांनी त्या पत्रकरा परिषदेत सांगितलं. ‘बिग बॉस मराठी’ चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित खेळ येत्या १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आणि नंतर दररोज रात्री ९.३० वाजता कलर्स चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. तसंच ‘बिग बॉस मराठी’ एक्स्ट्रा तुम्ही वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल.