मोदी सरकारवर जाहीर टीका केल्यानंतर अनुपम खेर यांचं नवं ट्विट; म्हणाले…

प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं असं अनुपम खेर यांनी सुनावलं होतं

करोना संकटात प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे अशी टीका केल्यानंतर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आता डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. अनुपम खेर हे मोदी प्रशंसक म्हणून ओळखले जातात. सोशल मीडिया तसंच जाहीर कार्यक्रमांमध्येही ते अनेकदा मोदी सरकारच्या बाजूने मत मांडताना दिसतात. पण गुरुवारी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी करोना स्थिती हाताळण्यावरुन मोदी सरकारच्या कामकाजावर नाराजी जाहीर केली होती.

“प्रतिमा बनवणं नव्हे तर जीव वाचवणं जास्त गरजेचं”, अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका

दरम्यान टीकेनंतर अनुपम खेर यांनी एक कविता ट्विट केली असून यामधून ते डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जे काम करतात तेच चुका करतात असा उल्लेख या कवितेत करण्यात आला आहे. अनुपम खेर यांनी मोदी सरकारचा उल्लेख केला नसली तरी अप्रत्यक्षपणे हे त्या टीकेवरील स्पष्टीकरण असल्याचं बोललं जात आहे.

काय ट्विट आहे –
“चुका त्यांच्याकडूनच होतात जे काम करतात, निरुपयोगी लोकांचं आयुष्य तर दुसऱ्याच्या चुका शोधण्यातच निघून जाते,” अशा आशयाची कविता अनुपम खेर यांनी ट्विट केली आहे.

टीका करताना काय म्हणाले होते –
एनडीटीव्ही वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी सरकारवर टीका केली होती. “कोव्हिडमुळे देशात सध्या जी स्थिती निर्माण झालीय त्यासाठी मोदी सरकारला जबाबदार धरणं गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीत प्रतिमा निर्माण करणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेचं आहे हे सरकारला लक्षात घ्यायला हवं. सरकारच्या आरोग्य सेवा व्यवस्थापनात चूक झाली आहे. मात्र इतर राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी या चुकांचा फायदा घेऊ नये.” असं म्हणत अनुपम खेर यांनी सरकारवर निशाणा साधला.

या मुलाखतीत पुढे ते म्हणाले, “सरकारने आता या आव्हानाचा सामना करणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्यासाठी काही करण्याची आता वेळ आलीय”.

सध्या देशभरातून मोदी सरकारवर टीका होतेय यावर ते म्हणाले, ” काही प्रमाणात टीका करणं वैध आहे. एखाद्या निर्दयी व्यक्तीलाच गंगा नदीतील मृतदेह पाहून फरक पडणार नाही”. “सध्या खूप समस्या, वेदना, राग,निराशा अशा गोष्टींचा आपण सामना करतोय. ते सहाजिक आहे. अनेक लोक म्हणतात मी खूप आशावादी आहे. पण माझ्याकडे त्याशिवाय पर्याय नाही. सध्या संपूर्ण जग या समस्येचा सामना करतंय,” असं ते म्हणाले.

अनुपम खेर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. देशातील घडामोडींवर ते त्यांचं मत मांडत असतात. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी ‘आयेगा तो मोदी ही” असं ट्विट केल्याने ट्रोल व्हावं लागलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actor anupam kher tweet poem after criticising narendra modi govenrment sgy

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या