सध्या सोशल मीडियामुळे आणि पीआरमुळे सेलिब्रिटीज आणि त्यांचे चाहते यांच्यातील अंतर बरंच कमी झालं आहे. सोशल मीडियामुळे चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजच्या आणखी जवळ आले आहेत. कधी कधी या गोष्टीचा गैरफायदादेखील काही मंडळी घेतात. बऱ्याचदा ही गोष्ट अभिनेत्रींच्या बाबतीत घडते, सार्वजनिक ठिकाणी आपल्या लाडक्या सेलिब्रिटीला पाहून काही चाहते हे सगळं विसरून जातात, अन् त्यांच्या हातून काहीतरी चुकीची कृती घडते.

हाच प्रकार नुकताच अभिनेत्री आहाना कुमराच्या बाबतीत घडला. ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने आयोजित केलेल्या एका इवेंटला गेली असताना आहानापाशी तिच्या बऱ्याच चाहत्यांनी घोळका केला. तिनेही अगदी हसत खेळत प्रत्येक चाहत्याबरोबर फोटो काढला, त्यापैकीच एक चाहता तिच्यापाशी जेव्हा फोटो काढायला आला तेव्हा त्याने परवानगी न घेता आहानाच्या हाताला स्पर्श केला. हे पाहून आहाना चांगलीच उखडली, “कृपया मला हात लावू नका” असं म्हणत ती तिथून चिडून निघून गेली. सोशल मिडियावर तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

आणखी वाचा : “जणू ३ मृतदेहच…” पेट्रोल पंपावर २००० रुपयांच्या नोटा खर्च करणाऱ्या आर. माधवनची ‘ती’ पोस्ट चर्चेत

काल हा व्हिडीओ समोर आला आणि आता नुकतंच आहानाने याबद्दल एक मजेशीर पण खोचक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या इंस्टाग्राम आकाऊंवर आहानाने तिचा पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील एक जबरदस्त हॉट फोटो शेअर केला आहे, हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “फक्त बघा, पण हात लावू नका.” याबरोबरच #maintainsafedistance हा हॅशटॅग वापरत तिने ही पोस्ट केली आहे. आहानाचा हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फोटोवरही काही लोकांनी आहानाच्या वागणुकीची टिंगल टवाळी केली आहे तर काहींनी तिचं कौतुक केलं आहे. कोणालाही परवानगीशिवाय स्पर्श करू नये असं एका युझरने कॉमेंट करत सांगितलं तर एकाने लिहिलं, “ही पोस्ट पाहून लाइक बटणलासुद्धा स्पर्श करायची भीती वाटते.” अशा बऱ्याच धमाल कॉमेंट आहानाच्या या पोस्टवर आपल्याला बघायला मिळतील. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटातून आहानाला ओळख मिळाली. चित्रपटांबरोबरच ती वेब विश्वातही चांगलीच सक्रिय आहे.