मनोरंजन सृष्टीतला संघर्ष हा कधीच कुणाला चुकलेला नाही. मग तो एखादा अनुभवी कलाकार असो किंवा कुणी नवखा कलाकार. त्यात या क्षेत्रातली घराणेशाहीबद्दल नेहमीच चर्चा होताना दिसते. या इंडस्ट्रीत सुरुवातीपासूनच अनेक स्टार्सच्या मुलांनी चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. इंडस्ट्रीत आई-वडिलांचं मोठं नाव असूनही अनेक स्टार किड्सना संघर्ष करावा लागला आहे.
यापैकीच एक स्टार किड म्हणजे बॉलीवूड अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन. अध्ययन सुमन गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहे; पण त्याचा आजवरचा प्रवास कधीच सोपा नव्हता. अशातच अध्ययनने बॉलीवूडमधील त्याच्या संघर्षांबद्दल सांगितले. यावेळी त्याने स्टार किड असूनही नकार आणि अपयश त्याच्या आजवरच्या प्रवासाचा एक भाग राहिला असल्याचं सांगितलं.
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, अध्ययन सुमनने त्याच्या बॉलीवूडमधील कामाबद्दल, तसंच या क्षेत्रातील घराणेशाहीबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्याने स्टार किड्सना यशाची हमी असते ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. माझ्या प्रवासात मला अनेकदा नकार, अपयश अशा परिस्थितींचा सामना करावा लागला आहे. मला अनेकदा प्रोजेक्ट्समधून नाकारण्यात आल्याचं सांगितलं.
याबद्दल अध्ययन म्हणाला, “हो, मी एका फिल्मी कुटुंबातून आलो आहे, पण सत्य हे आहे की मला कोणीही कधीही आयतं ताटात वाढलेलं काही दिलं नाही. माझ्या वडिलांनी आणि आईने मला भावनिक आधार दिला आहे. परंतू, मला प्रत्येक ऑडिशनसाठी आणि प्रत्येक संधीसाठी स्वत:लाच संघर्ष करावा लागला आहे.”
यापुढे तो म्हणाला, “लोकांना वाटतं की स्टार किड्स असणं म्हणजे यशाची हमी, परंतु हे अजिबातच खरं नाही. मला अनेक वेळा नकार आणि अपयशाचा सामना करावा लागला आहे. मला अनेकदा काम देण्यास नकार मिळाला आहे. पण मी स्वतःवर विश्वास ठेवणे कधीही थांबवले नाही.”
दरम्यान, अध्ययन सुमनबद्दल सांगायचं झालं तर तो ज्येष्ठ अभिनेते शेखर सुमन आणि निर्मात्या अलका सुमन यांचा मुलगा आहे. अध्ययनने २००८ मध्ये ‘हाल-ए-दिल’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तो ‘राज – द मिस्ट्री कंटिन्यूज’ या चित्रपटामध्ये दिसला. आगामी काळात तो चित्रपट आणि गाण्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.