Aditi Govitrikar Divorce : लोकप्रिय मॉडेल व अभिनेत्री आदिती गोवित्रीकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आता चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसली तरी ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. मिसेस वर्ल्ड अदिती घटस्फोटित आहे. मुफ्फझल लकडावालापासून तिने १६ वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. दोघांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं आणि ११ वर्षांनी २००९ मध्ये ते वेगळे झाले. या दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. घटस्फोटानंतर अदितीने एकटीनेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत अदितीने तिच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं होतं. “माझं अपयशी लग्न हे माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक आहे. मला जिंकायला आवडतं. लहानपणापासून मला जिंकायचं होतं, मला वर्गात पहिलं यायचं होतं, मला फियर फॅक्टर जिंकायचे होते, मला बिग बॉस जिंकायचं होतं. त्यामुळे माझं लग्न मोडलंय हे पचवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्याबरोबर असं का घडलं? हेच विचार मला यायचे,” असं अदिती म्हणाली.

अदिती गोवित्रीकरने व्यक्त केली इच्छा

“माझीही कुठेतरी चूक झाली असावी, याची जाणीव मला नंतर झाली, कारण टाळी एका हाताने वाजत नाही,” असं अदितीने म्हटलं. ती इच्छा व्यक्त करत म्हणाली, “माझी इच्छा आहे की एखाद्या दिवशी मी त्याच्याबरोबर (पूर्वाश्रमीचा पती) बसून आमच्या घटस्फोटाबद्दल बोलेन. कारण कधीकधी भांडणानंतर आपल्याला तो विषय कुठेतरी संपवणं गरजेचं असतं. आमच्यात एकमेकांना न सांगितल्या गेलेल्या अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे कदाचित कधीतरी आम्ही बोलू. आम्ही बोलून विषय संपवणं हे फक्त आम्हा दोघांसाठीच नाही तर मुलांसाठीही चांगलं होईल. आता इतकी वर्षे झाली आहेत, पण तुम्ही तुमचा भूतकाळ विसरू शकत नाही. आठवणी तुम्हाला भूतकाळात गुंतवून ठेवतात.”

अदितीचा घटस्फोट झाला असला तरी दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांच्या संपर्कात आहेत. “त्यांना एकटं वाढवणं खूप कठीण होतं. माझं बालपण खूप आनंदात गेलं होतं, कारण माझे आईवडील आमच्यासाठी एकत्र निर्णय घ्यायचे. मुलांनी सहलीला जायचं की नाही या गोष्टीही ते एकत्र ठरवायचे, पण मला मात्र सर्व काही एकटीला करावं लागायचं. मला आई आणि वडील दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागल्या. कामासाठी मुलांना माझ्या आई किंवा बहिणीकडे सोडावं लागायचं, त्याबद्दल मला अपराधीपणाची भावना मनात यायची,” असं अदिती म्हणाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अदिती गोवित्रीकरने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

“मी एका मोठ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. आणि तरीही मला समजलं नाही की ती व्यक्ती मला तडजोड करण्यास सांगत आहे. आणि मी त्याच्या तोंडावर हसले आणि तिथून निघून गेले. तू वेडा आहेस का की मूर्ख आहेस? असं काही तरी बोलून मी निघून गेले आणि यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला. त्याने दुसऱ्या दिवशी मला आणि माझ्या टीमला पॅकअप करून मुंबईला परत पाठवलं. मी तडजोड करायला नकार दिल्यामुळेच मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं,” असा वाईट अनुभव अदितीने सांगितला होता.