Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळले आहे. या विमानात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळल आहे, तिथून धुराचे लोट निघत असल्याचं दिसत आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आता या घटनेवर कलाकारांनीदेखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. रितेश देशमुख, रणदीप हुड्डा, अक्षय कुमार, सनी देओल, नील नितीन मुकेश, जान्हवी कपूर, परिणीती चोप्रा, दिशा पटानी हे सर्व कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत.

अहमदाबादमधील विमान अपघातानंतर कलाकार झाले व्यक्त

सनी देओलने एक्स अकाउंटवर लिहिले, “अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची बातमी ऐकल्यानंतर मला धक्का बसला. मी सगळ्यांसाठी प्रार्थना करत आहे. जे या अपघातात वाचले आहेत, त्यांची योग्य काळजी घेण्यात यावी आणि ज्यांनी या अपघातात प्राण गमावला, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. या दु:खद प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला शक्ती मिळू दे, ही प्रार्थना आहे.”

रितेश देशमुखने लिहिले, “अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताबद्दल ऐकल्यानंतर मला खूप दु:ख झाले आहे. सर्व प्रवासी, त्यांच्या कुटुंबीयांबरोबर माझ्या प्रार्थना आहेत.”

प्रसिद्ध लेखक चेतन भगतने अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याने लिहिले, “एअर इंडियाच्या विमानाबद्दल अहमदाबादमधून धक्कादायक बातम्या येत आहेत. उड्डाणानंतर इतक्या लवकर हे कसे घडले असेल? आम्हाला अशी आशा आहे की अधिक माहिती मिळेल, ज्यामध्ये संभाव्य कारणाचाही समावेश असेल.”

तसेच परिणीती चोप्राने लिहिले की, विमान अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खाची कल्पना करू शकत नाही. रणदीप हुड्डानेही एक्स हँडलवर लिहिले की, “अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झाले. माझ्या प्रार्थना सर्व पीडितांसोबत आहेत. बचाव पथकांना शक्ती मिळेल अशी आशा आहे. ज्यांनी या अपघातात प्राण गमावले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती मिळो.”

अहमदाबादमधील विमान अपघातानंतर आलिया भट्टनेदेखील तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत लिहिले, “हा विमान अपघात हादरवून टाकणारा आहे. सर्व प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर माझ्या प्रार्थना आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान अहमदाबादमध्ये उतरले. त्यानंतर काही प्रवाशांना घेऊन या विमानाने लंडनसाठी उड्डाण केले. मात्र, सात किमी अंतर पार केल्यानंतर हे विमान कोसळले. या विमान दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांना फोन करून केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे.