Amitabh Bachchan And Rekha relationship: अमिताभ बच्चन व रेखा हे दोन्ही कलाकार बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. दोघांचेही बॉलीवूडमधील योगदान मोठे आहे. मात्र, व्यावसायिक आयुष्याबरोबरच हे दोन्ही कलाकार आजही त्यांच्या खासगी आयुष्यामुळे मोठे चर्चेत असतात.
१९७०च्या दशकाच्या सुरुवातीला हे दोन्ही कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होते. त्यांनी एकमेकांबरोबर बऱ्याच चित्रपटात काम केले. एका दशकात त्यांनी जवळजवळ डझनभर चित्रपटात एकत्र काम केले. ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘दो अनजाने’, ‘नमक हराम’, ‘मिस्टर नटवरलाल’, अशा अनेक चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजले.
हा तो काळ होता, जेव्हा रेखा व अमिताभ बच्चन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत होत्या. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे आधीच जया यांच्याशी लग्न झाले होते. जेव्हा यश चोप्रा यांनी रेखा, जया व अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला सिलसिला हा चित्रपट बनवला, त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारलेला होता. या चित्रपटानंतर रेखा व अमिताभ बच्चन यांनी कधीच स्क्रीन शेअर केली नाही. मात्र, त्यांच्याबद्दल बोलले जात होते.
“त्यांच्यात काहीतरी नाते…”
दिवगंत राजकीय नेते अमर सिंग यांनी बिग बींचा किस्सा सांगितला होता. अमिताभ बच्चन यांनी एकदा एका पार्टीला हजेरी लावली होती. मात्र,त्याच पार्टीत रेखादेखील होत्या. त्यामुळे ते अर्ध्यातूनच निघून गेले. रेखा ज्या पार्टीचा भाग होत्या, त्याच पार्टीचा त्यांना भाग व्हायचे नव्हते.
अमर सिंग हे अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाचे अतिशय जवळचे होते. लेखक यासर उस्मान यांनी त्यांच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात अमर सिंग यांनी सांगितलेला एक किस्सा लिहिला आहे. अमर सिंग यांनी असे सांगितलेले, “एकदा शबाना आझमींनी आम्हाला त्यांच्या वाढदिवसाचे आमंत्रण दिले. मी जया आणि अमिताभसह त्यांच्या घरी पोहोचलो. आम्ही वेळेवर पोहोचलो आणि अमिताभ यांनी त्यांच्या ड्रायव्हरला जेवायला सांगितले कारण त्यांना बराच वेळ लागणार होता. आत पोहोचल्यावर रेखा आधीच तिथे उपस्थित असल्याचे आम्हाला दिसले.”
“अमिताभ बच्चन यांनी रेखा यांना पाहिले आणि ते लगेच परतले. ड्रायव्हर जेवण करण्यासाठी गेला होता. त्यामुळे आम्ही टॅक्सी बोलावली आम्ही घाईघाईत घरी परतलो. मी पुन्हा त्यांना याबद्दल कधीच विचारले नाही. पण, शबाना आझमींना शुभेच्छा देण्यासाठी अमिताभ का थांबले नाहीत, याबद्दल मला कायम आश्चर्य वाटत राहिले. या सगळ्यावरुन असे वाटते की त्यांच्यात काहीतरी नाते होते. जर त्यांच्यात काहीच नाते नसते तर त्यांनी कमीत कमी शबाना आझमींना शुभेच्छा दिल्या असत्या. पण तसे घडले नाही. “
हेमा मालिनी म्हणालेल्या….
अमर सिंग यांनी असेही सांगितलेले की एकदा हेमा मालिनी यांनीदेखील त्यांच्यासमोर रेखा व अमिताभ बच्चन यांचा विषय काढला होता. हेमा मालिनी म्हणालेल्या की तू अमिताभ बच्चन यांना भाऊ मानतोस, रेखा माझी जवळची मैत्रीण आहे. तू याबद्दल काही का करत नाहीस? पण, इतरांच्या गोष्टींत ढवळाढवळ करणे मला योग्य वाटले नाही.
अमिताभ बच्चन यांनी कधीही आजपर्यंत रेखा यांच्याबरोबरच्या नात्यावर कोणतेही वक्तव्य केले नाही. रेखा मात्र, विविध कार्यक्रमांत अमिताभ बच्चन यांच्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमाबद्दल अनेकदा बोलताना दिसतात.