Arbaaz Khan Confirms Wife Pregnancy : बॉलीवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वयाच्या ५७ वर्षी अरबाज खान बाबा होणार आहे. त्याची दुसरी पत्नी शुरा लवकरच आई होणार आहे. शुरा त्याच्यापेक्षा जवळपास २२ वर्षांनी लहान आहे. हे दोघंही क्लिनिक बाहेर एकत्र दिसल्याने शुरा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अभिनेत्याने स्वत: पत्नी शुरा खान आई होणार असल्याची आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.
पत्नी शुरा खान लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज अरबाजने ‘दिल्ली टाइम्स’शी संवाद साधताना दिली. अरबाजचं पहिलं लग्न मलायका अरोराशी झालं होतं. या दोघांच्या मुलाचं नाव अरहान खान आहे. १९ वर्षांच्या संसारानंतर अरबाज-मलायकाचा घटस्फोट २०१७ मध्ये झाला. यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये अरबाजने शुरा खानशी लग्न केलं.
शुरा गरोदर असल्याबद्दल प्रश्न विचारला असता अभिनेता म्हणाला, “हो हे खरं आहे आणि हा आमच्या आयुष्यातील खास क्षण आहे. मी प्रचंड आनंदी आहे आणि यामुळेच मला नव्याने जबाबदारीची जाणीव होत आहे. आम्हा दोघांचे कुटुंबीय सुद्धा ही गोड बातमी ऐकून प्रचंड आनंदी झाले. आमच्या आयुष्यात येणाऱ्या या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.”
“मी थोडा नर्व्हस आहे आणि या क्षणाला कोणीही नर्व्हस होईल कारण, अनेक वर्षांनी मी पुन्हा एकदा ‘फादरहूड’ अनुभवणार आहे. ही गुडन्यूज समजल्यापासून माझ्यात जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. आता मी भविष्यात कसा बाबा होईन… हे माहिती नाही. पण, इतकं नक्की सांगेन की आजच्या काळात चांगले आई-बाबा, चांगला पालक होणं आवश्यक आहे. जे आपल्या बाळावर प्रेम करतील, त्याच्यावर सदैव लक्ष देतील, त्याची काळजी घेतील आणि आपल्या मुलाला सगळ्या चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतील आणि मलाही हेच करायचं आहे.” असं अरबाजने सांगितलं.
शुरा खान कोण आहे?
अरबाजची दुसरी पत्नी शुरा ही मेकअप आर्टिस्ट आहे. आता वयाच्या ३५ व्या वर्षी शुरा आई होणार आहे. अरबाज-शुराचं लग्न २०२३ च्या अखेरिस झालं होतं. या दोघांच्या लग्नाला सलमान खान कुटुंबीय व बॉलीवूडचे मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित होते. अरबाज-मलायकाचा मुलगा अरहान देखील या लग्नात हजर होता.