बॉलीवूडच्या कलाकारांविषयी चाहत्यांना उत्सुकता असते तशी त्यांच्या कुटुंब अन् मुलांविषयीदेखील असते. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा वेगळा चाहतावर्गही निर्माण होतो. बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांची लेक राहा कपूरदेखील अशाच लोकप्रिय स्टारकिड्समध्ये येते. आता आलियाने राहाबरोबर तिचा आणि रणबीर कपूरचा दिवस कसा व्यतीत होतो याबद्दल खुलासा केला आहे.

आलिया भट्टने आपल्या लेकीला राहाला वाढविताना ती काय काळजी घेते आणि तिच्याबरोबर तिचा दिवस कसा असतो हे सांगताना म्हटले आहे की, ती आणि रणबीर राहाची काळजी घेताना हे लक्षात घेतात की, राहाला रोज काही वेळ बाहेर घेऊन गेलं पाहिजे आणि तिच्याबरोबर वेळ व्यतीत केला पाहिजे. त्याबरोबरच राहाला रोज पुस्तक वाचून दाखवणं या त्यांच्या दैनंदिनीमधील महत्त्वाच्या बाबी आहेत. अभिनेत्री याबद्दल अधिक बोलताना म्हणते की, राहाला पुस्तकं खूप आवडतात. मी तिला दोन, तीन पुस्तकं वाचून दाखवली आहेत. कधी मी कधी रणबीर न कंटाळता वेगवेगळी पुस्तकं प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक रात्री तिला वाचून दाखवतो. आम्ही एकही रात्र अशी घालवत नाही की, ज्या रात्री तिला पुस्तक वाचून दाखवलं जात नाही. कधी कधी दुपारी तिला झोपवतानादेखील गोष्टी ऐकायच्या असतात आणि आता आमची ही दैनंदिनी तयार झाली आहे. राहाचं तिच्या पुस्तकांवर इतकं प्रेम आहे की, ती झोपेत पुस्तकांना मिठी मारून झोपते. पुढे बोलताना आलिया भट्ट म्हणते, “ही पुस्तकांची ताकद आहे. पुस्तकांतून शब्द आणि कल्पना तुमच्या मुलांबरोबर जोडल्या जातात. मी जेव्हा लहान मुलांसाठी पुस्तक लिहिलं तेव्हा मला या गोष्टींनीच प्रेरणा दिली होती.” आलिया भट्टने नुकतेच ‘एड फाइन्ड्स ए होम’ हे लहान मुलांसाठी पुस्तक लिहिले आहे.

हेही वाचा : “दीपिकाला एक लहान…”, ‘कल्की २८९८ एडी’च्या दिग्दर्शकाने सांगितला चित्रपटातील त्याचा आवडता सीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया पुढे म्हणते की, आयुष्य वर्तुळासारखं आहे. कारण- मी लहान असताना जी पुस्तकं वाचली नाहीत, ती पुस्तकं मी आता राहाची आई म्हणून वाचत आहे. राहा माझ्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. त्यामुळेच ‘एड फाइन्ड्स ए होम’ हे लहान मुलांसाठीचं माझं पुस्तक मी राहाला समर्पित केलं आहे आणि यापुढे जे काही करेन, ते राहाचा विचार करून केलेलं असेल.

दरम्यान, राहाचा जन्म नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता आणि २०२३ च्या ख्रिसमसला संपूर्ण जगाला तिचा चेहरा पाहायला मिळाला होता. राहाला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ती आपल्या आजोबांसारखी म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचे म्हटले होते. सोशल मीडियावर राहाच्या व्हिडीओ आणि फोटोंना मोठी पसंती मिळताना दिसते.