Chhaava Box Office Collection Day 5 : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरू आहेत. सगळ्या प्रेक्षकांना सिनेमा पाहता यावा यासाठी खास सकाळी ६ च्या आणि रात्री उशिरा १२ नंतरच्या शोचं देखील आयोजन करण्यात येत आहे. प्रेक्षक शो संपल्यावर सिनेमागृहांमध्येच भावुक होऊन शिवगर्जना करत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे ‘छावा’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा झपाट्याने वाढत आहे.

‘छावा’ १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल ३३.१ कोटींची कमाई करत इतिहास रचला. व्हॅलेंटाइन डे दिवशी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांमध्ये ‘छावा’ने आजवर सर्वाधिक कमाई केली आहे. यापूर्वी आलिया-रणवीरच्या ‘गल्ली बॉय’ चित्रपटाच्या नावावर हा रेकॉर्ड होता.

शुक्रवारी पहिल्याच दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यावर शनिवार-रविवारी सिनेमा चांगली कामगिरी करणार याचा अंदाज चित्रपट समीक्षकांनी आधीच वर्तवला होता आणि अपेक्षेप्रमाणे शनिवारी ( १५ फेब्रुवारी ) ‘छावा’ने ३९.३ कोटींचा गल्ला जमावला.

‘छावा’ सिनेमाच्या कमाईत तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी मोठी वाढ झाली. या सिनेमाने रविवारी ( १६ फेब्रुवारी ) तब्बल ४९.०३ कोटी कमावले. तर, मंडे टेस्टमध्ये सुद्धा विकी कौशलचा सिनेमा पास झाला. सोमवारी या सिनेमाने २४.१ कोटींचा गल्ला जमावला. यामुळे चार दिवसांची कमाई १४५.५३ कोटी असल्याची अधिकृत आकडेवारी ‘मॅडडॉक फिल्म्स’ने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.

‘छावा’च्या पाचव्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल सांगायचं झालं, तर ‘मॅडडॉक फिल्म्स’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘छावा’ने मंगळवारी २५.७५ कोटींची कमाई केली आहे. यामुळे सिनेमाची पाच दिवसांची कमाई १७१.२८ कोटी एवढी झाली आहे. ‘कोईमोई’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘छावा’चं बजेट १३० कोटी होतं. त्यामुळे या सिनेमाने अवघ्या चार दिवसांतच आपलं बजेट वसूल केल्याचं समोर आलं आहे.

‘छावा’ सिनेमाला देशभरात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक पसंती मिळत आहे. पाचव्या दिवशी मुंबईतल्या शोजला ५४ टक्के गर्दी होती. तर, पुण्यात ६९ टक्के गर्दी होती. ही टक्केवारी देशातील अन्य शहरांच्या तुलनेत खूप जास्त आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
छावा सिनेमाकलेक्शन ( Per Day )
पहिला दिवस ( व्हॅलेंटाइन डे )३३.१ कोटी
दुसरा दिवस ( शनिवार )३९.३ कोटी
तिसरा दिवस ( रविवार )४९.३ कोटी
चौथा दिवस ( सोमवार )२४.१ कोटी
पाचवा दिवस ( मंगळवार )२५.७५ कोटी
एकूण – पाच दिवसांची कमाई१७१.२८ कोटी*

दरम्यान, ‘छावा’मध्ये विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह, दिव्या दत्ता, डायना पेंटी, प्रदीप रावत, नील भूपालम, संतोष जुवेकर असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.