सप्टेंबर २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपट सीरिजच्या पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या हीट किंवा फ्लॉप ठरण्यावरुन बरीच चर्चा झाली, मतभेद समोर आले. या चित्रपटाने जगभरात ४०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली. या चित्रपटातील रणबीर-आलियाची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. या चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर या चित्रपटाचे पुढील भाग कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती. तर आता अखेर या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याने ‘ब्रह्मास्त्र २’ आणि ‘ब्रम्हास्त्र ३’बद्दल मोठी घोषणा केली आहे.
कोविडनंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘ब्रह्मास्त्र’ हा पहिला बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ठरला. रणबीर कपूर, आलिया भट्टबरोबर या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, शाहरुख खान हे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाचा पुढील भाग २०२५ साली प्रदर्शित होईल असं बोललं जात होतं. पण आता अयान मुखर्जी याने या चित्रपटाच्या पुढील भागाबद्दलचा त्याचा प्लॅन उघड करत ब्रह्मास्त्र २ आणि ब्रम्हास्त्र ३ कधी प्रदर्शित होईल हे सांगितलं आहे.
आणखी वाचा : ‘ब्रह्मास्त्र’ने मोडले ‘हे’ ७ मोठे रेकॉर्ड्स, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांना टाकले मागे
अयान मुखर्जी याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आज एक मोठी पोस्ट शेअर केली. ‘ब्रम्हास्त्र’ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानून ब्रह्मास्त्र २ आणि ब्रह्मास्त्र ३ हे चित्रपट त्याहून भव्य असतील असं त्याने या पोस्टमध्ये सांगितलं. तर याच बरोबर या दोन्ही चित्रपटांवर तो एकत्रच काम करणार आहे. याचं कारण म्हणजे हे दोन चित्रपट त्याला एका पाठोपाठ एक प्रदर्शित करायचे आहेत. त्यानुसार ‘ब्रह्मास्त्र २’ हा चित्रपट डिसेंबर २०२६ साली प्रदर्शित होईल तर ‘ब्रम्हास्त्र ३’ हा चित्रपट लगेचच डिसेंबर २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
हेही वाचा : ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागावरून नवा वाद सुरू; नेमकं कारण काय?
अयानची ही पोस्ट सध्या खूपच चर्चेत आली आहे. या पोस्टवर कमेंट करत त्याचे चाहते या दोन्ही चित्रपटांबद्दल उत्सुकता व्यक्त करत त्यांना शुभेच्छा देत आहेत.