Divya Bharti Secret Marriage: दिव्या भारती ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘शोला व शबनम’, ‘दीवाना, ‘दिल क्या कसूर’, ‘दिल आशना है’ अशा अनेक चित्रपटांतून दिव्या भारतीने लोकप्रियतेचे शिखर गाठले होते.
आजही दिव्या भारतीबद्दल अनेकदा बोलले जाते. अभिनेत्रीचे किस्से सांगितले जातात. दिव्या भारतीच्या लव्ह स्टोरीबाबत आजही बोलले जाते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, दिव्या भारतीने साजिद नाडियाडवालाशी गुपचूप लग्न केले होते. विशेष बाब म्हणजे तिच्या या लग्नाबाबत तिच्या पालकांना कोणतीही कल्पना नव्हती.
‘शोला व शबनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिव्या भारतीची निर्माता साजिद नाडियाडवालाशी ओळख झाली. साजिद नाडियाडवाला गोविंदाला भेटण्यासाठी सेटवर येत असे. समोर आलेल्या माहितीनुसार, दिव्याला पाहताच साजिद तिच्या प्रेमात पडला होता. त्यांच्यात मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. १० मे १९९२ ला त्यांनी गुपचूप लग्न केले. त्यावेळी दिव्या फक्त १८ वर्षांची होती. साजिदबरोबर लग्न करणे दिव्याच्या आयुष्यातील सर्वांत मोठा निर्णय होता; मात्र तिने याबद्दल कोणालाही कल्पना दिली नाही. विशेष बाब म्हणजे दिव्याने तिच्या वडिलांना म्हणजे ओम प्रकाश भारती यांच्यापासूनदेखील ही गोष्ट लपवली.
जेव्हा दिव्या १८ वर्षांची झाली…
‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत दिव्या भारतीच्या आईने म्हणजेच मिता भारती यांनी त्यांच्या मुलीने तिच्या लग्नाची गोष्ट अनेक महिने लपवून ठेवल्याचा खुलासा केला होता. मिता भारती म्हणाल्या होत्या, “गोविंदाला भेटण्यासाठी साजिद शोला व शबनम या चित्रपटाच्या सेटवर येत असत. त्यावेळी त्यांची ओळख दिव्याशी झाली. अगदी सुरुवातीलाच दिव्यानं मला विचारलं होतं. आई, तुला साजिद कसा वाटतो? त्यावेळी मी तिला मला तो चांगला वाटतो, असं सांगितलं होतं. काही दिवसांनी तिनं मला विचारलं की, ती साजिदबरोबर लग्न करू शकते का? त्यावर मी तिला सांगितलं होतं की, तुझ्या वडिलांना विचार.ठ
“दिव्याचे वडील साजिद व तिच्या लग्नाविरुद्ध होते. त्यांची स्वत:ची मतं होती. जेव्हा दिव्या १८ वर्षांची झाली. तेव्हा तिनं मला फोन करून सांगितलं की, मला साजिदबरोबर लग्न करायचं आहे आणि तू साक्षीदार म्हणून सही करण्यासाठी ये. पण, मी तिला सांगितलं की, जोपर्यंत ती तिच्या वडिलांना याबद्दल सांगत नाही, तोपर्यंत मी साक्षीदार म्हणून येणार नाही.”
आईने स्पष्ट शब्दात सांगूनही दिव्याने साजिदबरोबर लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नानंतर ती साजिदबरोबर राहण्यासाठी गेली नाही. ती तिच्या घरी राहिली. साजिदला ती कधीतरी भेटायची. तिच्या वडिलांना तिच्या लग्नाबद्दल कोणतीही कल्पना नव्हती.
दिव्याच्या आईने पुढे सांगितले की, काही महिन्यांनंतर दिवाळीच्या वेळी साजिद घरी आला. तो आम्हाला भेटला. जेव्हा दिव्याचे वडील व त्याच्यात संभाषण सुरू होतं, तेव्हा त्यानं दिव्याबरोबरच्या लग्नाबाबत सांगितलं. त्यावर दिव्याच्या वडिलांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ते शांत राहिले. जेव्हा साजिद गेला तेव्हा त्यांनी मला विचारलं की, मी त्यांना याबद्दल का सांगितलं नाही. मी त्यांना म्हणाले की, मी दिव्याला तिनं स्वत: तुमच्याशी याबद्दल बोलावं असं सांगितलं होतं. दोन दिवस ते काहीही बोलले नाहीत. तिसऱ्या दिवशी त्यांनी साजिदला घरी बोलावण्यास सांगितलं. त्यांनी लग्न केलं आहे, तर आपल्याला ते स्वीकारावं लागेल, असे ते म्हणाले.
लग्नाला वर्ष होण्याअगोदरच दिव्या भारतीचा मृत्यू झाला. ५ एप्रिल १९९३ ला दिव्या भारतीचा बाल्कनीमधून खाली पडून मृत्यू झाला. तिचे वय अवघे १९ वर्षांचे होते. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने बॉलीवूडवर शोककळा पसरली होती. तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता आणि साजिदलादेखील तिच्या मृत्यूचा धक्का बसला होता.
दिव्या भारतीच्या निधनानंतर साजिदने तिच्या पालकांची काळजी घेतली. मुलाचे कर्तव्य पार पाडले. २००० साली साजिदने पत्रकार वर्धा खान यांच्याशी लग्न केले.