Housefull 5 Box Office Collection Day 1: मागील अनेक दिवसांपासून ज्या बिग बजेट चित्रपटाची बॉलीवूडमध्ये चर्चा होती तो ‘हाऊसफुल 5’ अखेर प्रदर्शित झाला आहे. ‘हाऊसफुल 5’ ६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली आहे.
खरं तर मागील काही वर्षे अक्षय कुमारसाठी चांगली राहिली नाहीत, कारण त्याचे चित्रपट फ्लॉप ठरले. पण २०२५ मध्ये त्याचे सरासरी कामगिरी तरी करत आहेत. ‘केसरी चॅप्टर २’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता ‘हाऊसफुल ५’ देखील प्रदर्शित झाला आहे. ‘हाऊसफुल 5’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. अक्षयच्या ‘केसरी चॅप्टर २’ पेक्षा या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई जास्त आहे.
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, २४० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या ‘हाऊसफुल 5’ ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल २३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या चित्रपटासाठी ही एक चांगली सुरुवात आहे. पहिल्या दिवसाची कमाई पाहता शनिवार व रविवारी त्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटात अनेक उत्तम कलाकार आहेत. चित्रपटाला समिक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी, प्रेक्षक मात्र हा मजेदार चित्रपट असल्याचं म्हणत आहेत. कॉमेडी-थ्रिलर चित्रपट एकूणच प्रेक्षकांना भावल्याचं दिसत आहे.
हाऊसफुल ४ चे ओपनिंग कलेक्शन
‘हाऊसफुल 5’ ने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल ४’ च्या ओपनिंग कलेक्शनला मागे टाकलं आहे. ‘हाऊसफुल ४’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १९.०८ कोटी रुपये कमावले होते.
दरम्यान, ‘हाऊसफुल 5’ फक्त ‘केसरी २’ च्या ओपनिंग कलेक्शनलाच मागे टाकले नाही तर या वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा जास्त कमाई केली. ‘स्काय फोर्स’ने पहिल्या दिवशी ११.५० कोटींची कमाई केली होती.
‘हाऊसफुल 5’ च्या ऑक्युपेन्सीबद्दल बोलायचं झाल्यास सर्वाधिक प्रेक्षक रात्रीच्या शोला मिळाले. सकाळी १३.८६ टक्के, दुपारी २८ टक्के व संध्याकाळी २८.१ टक्के ऑक्युपेन्सी होती. तर, रात्री या चित्रपटाला ४५.६५ टक्के ऑक्युपेन्सी मिळाली.
‘हाऊसफुल 5’ मधील कलाकार
या सिनेमात अक्षय कुमारबरोबर अभिषेक बच्चन, फरदीन खान, रितेश देशमुख, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, रणजीत, जॅकलिन फर्नांडिस, चंकी पांडे, डिनो मोरिया आणि सौंदर्या शर्मा यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट ए व बी अशा दोन व्हर्जनमध्ये प्रदर्शित झाला आहे.