प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की, त्याच्या वाट्याला चांगल्यातलं चांगलं काम यावं. प्रेक्षकांमध्ये त्यांच्याबद्दल चर्चा व्हावी, त्याला मोठमोठे पुरस्कार मिळावेत; पण फार कमी कलाकार असे असतात, ज्यांना हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी प्राप्त होतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट. आलिया भट्ट बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ३० वर्षीय या अभिनेत्रीनं अवघ्या कमी काळात एकापेक्षा एक भूमिका साकारत इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. तिच्या बऱ्यापैकी सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

केवळ व्यावसायिकच नव्हे, तर खासगी आयुष्यामध्येही अभिनेत्रीनं चांगला समतोल साधल्याचं दिसतं. त्याकरता अनेक जण तिचं कौतुकही करत असतात. कारण- कुठल्याही कलाकारासाठी व्यावसायिक आणि खासगी आयुष्यामध्ये समतोल साधणं हे तितकंसं सोपं नसतं. पण, या अभिनेत्रीनं मात्र ते उत्तमपणे साधलं आहे. त्यामुळेच तिच्या सहकलाकारांना तिचं कुतूहलही वाटतं. तर काहींना यासाठी तिचा हेवासुद्धा वाटतो. अशातच अभिनेत्री सारा अली खाननंही याबद्दल वक्तव्य केलं होतं. अभिनेत्री म्हणाली, “मला आलिया भट्टचं यश पाहून हेवा वाटायचा. तिनं तिच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यातही मिळवलेलं यश पाहून तिचा हेवा वाटला होता. जेव्हा तिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा तिला हा पुरस्कारही मिळाला. तिला एक गोंडस बाळही आहे. तिचं आयुष्य परिपूर्ण झालं आहे, असं वाटलं होतं. पण, मला तिनं यासाठी घेतलेली मेहनत माहीत नव्हती. हे सगळं मिळेपर्यंत ती कोणत्या आव्हानांना सामोरी गेली असेल याची काहीच कल्पना आपल्याला नसते.”

आलियाबद्दल बोलताना सारा पुढे म्हणाली. “तिलासुद्धा अनेकदा नकार, अपयश याचा सामना करावा लागला असेल. त्यामुळे नाण्याच्या दोन बाजू असतात. आपल्याला फक्त लोकांना मिळालेलं यश दिसतं; पण त्यामागे असलेली त्यांची मेहनत लवकर दिसत नाही.” आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील कामासाठी राष्ट्रीय परस्कारानं सन्मान करण्यात आला होता. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये तिनं साकारलेल्या गंगूबाईच्या भूमिकेनं साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री सारा अली खानबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच ‘मेट्रो इन दिनो’ या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. अभिनेता आदित्य रॉय कपूरही तिच्यासह यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र काम आहेत. त्यामुळे प्रेक्षक या फ्रेश जोडीतील केमिस्ट्री पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या दोघांसह चित्रपटामध्ये कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अनुपम खेर यांसारखे कलाकारही झळकणार आहेत. हा चित्रपट ४ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.