Janhvi Kapoor Wears Late Mom Sridevi’s Saree : बॉलीवूडची स्टारकिड जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘होमबाउंड’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २०२६ च्या अकादमी पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म कॅटेगरीमध्ये भारताकडून ‘होमबाउंड’ हा हिंदी चित्रपट पाठवण्यात आला आहे. यामध्ये इशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

जान्हवीचा हा सिनेमा २६ सप्टेंबरला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. नुकतंच ऑस्करच्या शर्यतीत असलेल्या या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. यावेळी अभिनेत्री जान्हवी कपूर खास साडी नेसून या सोहळ्याला पोहोचली होती. जान्हवीला या कार्यक्रमातील पाहुण्यांनी, “तू खूपच सुंदर दिसतेस” अशी प्रतिक्रिया दिली. यावर अभिनेत्रीने, “ही साडी माझ्या आईची आहे” असं सांगितलं. ही साडी श्रीदेवी यांनी ८ वर्षांपूर्वी नेसली होती.

जान्हवी कपूर नेव्ही ब्लू आणि सोनेरी रंगाचं भरतकाम केलेल्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहताच चाहत्यांना दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण आली. श्रीदेवी यांचं २४ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन झालं. पण, त्याआधी डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला श्रीदेवी यांनी हीच रॉयल साडी नेसली होती.

जान्हवीने ऑस्करच्या शर्यतीत असलेल्या ‘होमबाउंड’ सिनेमाच्या स्क्रिनिंगला ही साडी नेसली होती. यादरम्यानचे तिचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “जान्हवीमुळे आज श्रीदेवी यांची आठवण आली”, “जान्हवी खूपच सुंदर दिसतेय”, “कमाल…आईचे आशीर्वाद तिच्या कायम पाठिशी आहेत” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, परीक्षक समितीने २४ चित्रपटांमधून इशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘होमबाउंड’ या चित्रपटाची निवड केली आहे. हा सिनेमा २६ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होईल. यावर्षीच्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह नुकत्याच झालेल्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही ‘होमबाउंड’ सिनेमाला भरभरून दाद मिळाली.