Kamal Haasan Thug Life Movie : अभिनेते कमल हासन यांनी काही दिवसांपूर्वी कन्नड भाषा तमिळ भाषेतून जन्माला आली असल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर सर्वत्र रोष पाहायला मिळाला. कमल हासन यांनी कन्नड भाषेबद्दल केलेल्या विधानाविरुद्ध काही गटांनी निषेध व्यक्त केला होता. तसंच त्यांच्या ‘ठग लाईफ’ या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली. कमल हासन त्यांच्या विधानाबद्दल जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांचा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार नाही, असा इशारा कर्नाटक फिल्म चेंबर्सने दिला होता.

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी “कायद्याच्या नियमानुसार सीबीएफसी प्रमाणपत्र असलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, प्रेक्षक कदाचित तो चित्रपट पाहणार नाहीत, पण लोकांनी चित्रपट पाहावाच असा आग्रह करता येणार नाही, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित व्हावा” असं म्हणत कर्नाटक सरकार आणि उच्च न्यायालयाला फटकारलं. तरीही चित्रपटाच्या वितरकाने हा चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘ठग लाईफ’चे कर्नाटकमधील वितरक वेंकटेश कमलाकर यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं, “मी हा चित्रपट प्रदर्शित करणार नाही आणि माझ्याकडे याची अनेक कारणे आहेत. मी चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. कोणत्याही चित्रपटाला जर नफा कमवायचा असेल तर तो फक्त चित्रपट प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांमध्येच कमावता येतो आणि ‘ठग लाईफ’ चित्रपट प्रदर्शित होऊन आता दोन आठवड्यांहून अधिक वेळ झाला आहे.”

एका निर्मात्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, चित्रपटाचे वितरण हक्क हे वादाआधीच खरेदी केले गेले होते आणि त्यासाठी कमलाकर यांनी चित्रपटगृहांच्या मालकांकडून ८ ते १० कोटी रुपये आगाऊ म्हणून घेतली होती. तसंच भाषेबद्दलच्या वादामुळे कन्नड समर्थक आधीच रस्त्यावर उतरलेले असताना चित्रपटगृहांवरील हल्ल्यांच्या भीतीने अनेक मालकांनी चित्रपट प्रदर्शित करण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं आहे. मग आता कोणी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा धोका का पत्करेल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमल हासन यांच्या ‘ठग लाईफ’ चित्रपटाची आतापर्यंतची कमाई

मणिरत्नम दिग्दर्शित ‘ठग लाईफ’ चित्रपट ५ जून रोजी कर्नाटक वगळता संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला. कमल हासन यांच्या कन्नड भाषेबद्दलच्या वक्तव्यामुळे चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासूनच चर्चेत होता, त्यामुळे प्रदर्शनानंतर चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि याचा परिणाम कमाईवर झाला. दरम्यान, Sacnilk नुसार ‘ठग लाईफ’ चित्रपटाने मंगळवार (१७ जून) पर्यंत एकूण ४७.०४ रुपयांची कमाई केली आहे, जी चित्रपटच्या बजेटनुसार कमी असल्याचं म्हटलं जात आहे.