Karan Johar On Whatsapp Chats : बॉलीवूडच्या काही प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक म्हणजे करण जोहर. आजवर त्याने अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याशिवाय त्याने त्याच्या चित्रपटांमधून अनेक नव्या चेहऱ्यांना संधीही दिली आहे. करण हा निर्माता असल्याने साहजिकच बॉलीवूडच्या अनेक बड्या कलाकारांबरोबर त्याचे चांगले संबंध आहेत. आपल्या कामामुळे चर्चेत असणारा करण अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असतो.
अशातच त्याने त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटबद्दल खुलासा केला आहे. करण जोहरने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, त्याचा इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांबरोबर एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. त्या ग्रुपमधील संभाषण जर लीक झालं, तर तो येथे राहू शकणार नाही. त्याला लंडनला पळून जावं लागेल. करणच्या या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टींवर चर्चा होते हेदेखील त्यानं सांगितलं.
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तो आणि त्याचे सेलिब्रिटी मित्र काय बोलतात, याबद्दल करण म्हणाला, “मी तुम्हाला सांगतो की, मी आणि माझे मित्र आमच्या आजूबाजूला काय चाललं आहे याचं अतिशय स्पष्ट आणि प्रामाणिकपणे विश्लेषण करतो. त्यात आम्ही फॅशनबद्दल टीका करतो, कधी चित्रपट समीक्षक बनतो, आम्ही त्या ग्रुपमधील प्रत्येक गोष्टीचे समीक्षक आहोत.”
करण जोहर इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे करण असं म्हणाला, “त्या ग्रुपमधील प्रत्येकाला स्वतःचं मत असतं आणि कधी कधी ते खूप विचित्रही असू शकतं. आमच्यापैकी कोणीही कधीही त्याची मतं उघडपणे मांडू शकत नाही. त्यामुळे आमचं त्या ग्रुपमधील संभाषण कधी बाहेर आलं, तर मला देश सोडावा लागू शकतो. आम्ही तिकडे राहू शकत नाही. आम्हाला लंडनला पळून जावं लागेल.”
त्यानंतर त्यानें सांगितलं की, तो फक या गॉसिप ग्रुप्सचाच भाग नाही; तर यश आणि रुही (करणची मुलं) यांच्यासंबंधित एका व्हॉट्सअॅप ग्रुप्सचादेखील भाग आहे. त्यात अनेकदा गंभीर चर्चा होतात आणि या ग्रुपमध्ये बहुतांश स्त्रिया आहेत. त्याबद्दल तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही दोन व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर असता; तेव्हा ते एकाच वेळी गंभीर आणि मजेदारदेखील असू शकते.”
नंतर करणनं सांगितलं, “मी रोज सकाळी या ग्रुपमधील स्त्रियांना गुड मॉर्निंगचा आणि नमस्कारचा मेसेज करतो. त्या ग्रुपमधील स्त्रिया खूप काळजी करणाऱ्या आणि मदत करणाऱ्या आहेत. त्यांनी मला माझ्या कठीण काळात खूप चांगली मदत केली आहे. माझ्या एकल पालकत्वात काही अडचण आल्यास मला त्यांची मदत होते.”
दरम्यान, करण जोहर सध्या त्याच्या रिॲलिटी शो ‘द ट्रेटर्स’मुळे चर्चेत आहे. या शोचा ग्रँड फिनाले एपिसोड गुरुवारी प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटानंतर करणने दिग्दर्शनापासून दूर राहून चित्रपट निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं आहे. ‘द ट्रेटर्स’नंतर त्याचा ‘सरजमीन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २५ जुलै रोजी जिओ हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.