Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या लग्नाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. अभिनेत्रीचा विवाहसोहळा १७ ऑक्टोबर १९९९ रोजी कॅलिफोर्निया येथे पार पडला होता. डॉ. नेने आणि माधुरी या दोघांकडे नेहमीच आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे नुकत्याच IANS या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीला त्यांच्या लग्नाबद्दल तसेच सुखी संसाराचं रहस्य काय असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ‘धकधक गर्ल’ने काय प्रतिक्रिया दिलीये जाणून घेऊयात…

माधुरी ( Madhuri Dixit ) आणि डॉ. नेने यांची पहिली भेट अमेरिकेत अभिनेत्रीच्या भावाच्या घरी आयोजित एका घरगुती पार्टीमध्ये झाली होती. यानंतर दोघांमध्ये ओळख होऊन नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पहिली भेट झाल्यावर माधुरी आणि श्रीराम नेने यांनी एकमेकांना फक्त ३ महिने डेट केलं. त्यानंतर लगेच त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर अभिनेत्रीने २००३ मध्ये तिचा पहिला मुलगा अरिन आणि त्यानंतर २००५ मध्ये माधुरीने रायनला जन्म दिला. या काळात अभिनेत्री काही वर्षे इंडस्ट्रीपासून दूर होती. या सगळ्या प्रवासाबद्दल माधुरी सांगते, “कोणत्याही नात्यात समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. तुम्हाला काही गोष्टी समोरच्याला द्यावा लागतात, तर काही गोष्टी आपल्या जोडीदाराकडून शिकाव्या लागतात. लग्न किंवा रिलेशनशिप सांभाळणं म्हणजे ‘गिव्ह अँड टेक’सारखं आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे.”

हेही वाचा : Video : दिवसाला १०० सिगारेट ओढायचा शाहरुख खान! आता कायमचं सोडलं धूम्रपान पण, होतोय ‘हा’ त्रास, स्वत:च केला खुलासा

सुखी वैवाहिक आयुष्याबद्दल सांगताना माधुरी पुढे म्हणाली, “लग्नानंतर दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एका छताखाली वावरत असतात त्यामुळे या गोष्टीची जशी सकारात्मक बाजू आहे तशी नकारात्मक बाजू देखील आहे. या सगळ्या बाबी आपण समजून घेणं आवश्यक असतं. प्रत्येकाने आपल्या जोडीदाराच्या साथीने आपलं ध्येय गाठण्यासाठी काम केलं पाहिजे. कारण, प्रत्येकाची वैयक्तिक स्वप्नं असतात, प्रत्येकाचं वैयक्तिक ध्येय असतं आणि आपण आपल्या जोडीदाराच्या साथीने यासाठी काम केलं पाहिजे.”

“कोणतंही नातं टिकवणं हे अजिबातच सोपं नाही. तुम्ही रोज तुमच्या नात्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोडीदारांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. एकमेकांसाठी समान प्रेम, समान आदर आणि जोडीदाराला स्वत:चा स्पेस देणं देखील महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुम्ही तुमचं लग्न अथवा कोणतंही नातं आनंदाने निभावू शकता” असं माधुरीने ( Madhuri Dixit ) सांगितलं.

हेही वाचा : आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माधुरी ( Madhuri Dixit ) आता ५७ वर्षांची आहे. १९८४ मध्ये ‘अबोध’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आजवर भारत सरकारने अनेक पुरस्कार देऊन अभिनेत्रीचा सन्मान केला आहे. यामध्ये २००८ मध्ये मिळालेल्या मानाच्या पद्मश्री पुरस्काराचा देखील समावेश आहे. अभिनयाव्यतिरिक्त गेली चार दशकं माधुरीने तिच्या नृत्याने सुद्धा सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.