Sanjay Leela Bhansali’s Heeramandi Series : संजय लीला भन्साळी हे हिंदी सिनेविश्वातील मोठं नाव. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय आणि सदैव काहीतरी वेगळं करण्याच्या शोधात ते असतात, म्हणून त्यांच्या कलाकृतींना प्रेक्षकांचा कायम सकारात्मक प्रतिसाद मिळालेला दिसतो.

संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम मिळावं, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी यासाठी मोठ मोठे कलाकार प्रयत्नशील असतात. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच संजय यांच्या गाजलेल्या वेब सीरिजबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. या अभिनेत्री म्हणजे मुमताज. मुमताज यांनी संजय लीला यांच्या वेब सीरिजमध्ये काम करण्यास नकार देण्यामागचं कारणही सांगितलं आहे.

‘बॉम्बे टाईम्स’शी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, “मला संजय खूप आवडतो. जर तुम्ही त्याची ‘हिरामंडी’ ही वेब सीरिज पाहिली तर त्यात कलाकारांची मोठी स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. त्यातील प्रत्येक भूमिकेचं काहीतरी वेगळेपण असल्याचं जाणवतं.” पुढे मुमताज या सीरिजला नकार देण्यामागचं कारण सांगत म्हणाल्या, “कलाकारांची मोठी फौज असलेल्या वेब सीरिजमध्ये मला काय वेगळं करायला मिळेल असं वाटलं संजयने मला तो माझ्यासाठी भूमिकेत काही बदल करू शकतो असंही सांगितलं होतं परंतु, मला ती भूमिका फार वेगळी नही वाटली.”

संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल बोलताना मुमताज पुढे म्हणाल्या, “संजयबरोबर काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. पण, मला एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारायला आवडेल. मला अशा चित्रपटात काम नाही करायचं आहे, जिथे प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण असतं; यामुळे सगळ्यांना सारखंच महत्त्व प्राप्त होतं. माझा मुद्दा संजयला कळला होता.”

अभिनेत्री मुमताज संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’मधून पुनरागमन करणार होत्या. परंतु, त्यांना ही भूमिका फारशी आवडली नसल्याने त्यांनी यामध्ये काम करण्यास नकार दिला. यामध्ये जेव्हा त्यांना त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांनी घेतलेल्या ब्रेकबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या, “मी वयाच्या सातव्या वर्षांपासून कॅमेऱ्यासमोर काम करत आहे, त्यामुळे जेव्हा मी ब्रेक घेतला होता तेव्हा मला चुकल्यासारखं अजिबात वाटत नव्हतं. मी खूप थकले होते, पण मला माझ्या सहकलाकरांची खूप आठवण यायची. त्यांच्यासह काम करताना खूप मजा यायची.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुमताज यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी शेवटचं ‘आंधिया’ या चित्रपटात शकुंतला ही भूमिका साकारली होती. ‘फ्री प्रेस जनरल’च्या वृत्तानुसार त्यांनी लग्न केल्यानंतर अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला. लग्नानंतर सासरच्या मंडळींचं इंडस्ट्रीबद्दल फार चांगलं मत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.