नाग अश्विन दिग्दर्शित कल्की २८९८ एडी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. विज्ञान आणि पौराणिक कथा यांना एकत्र आणून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. आधुनिक युगात वाईट शक्तींपासून माणसाचे रक्षण कऱण्यासाठी कल्कीचा जन्म होतो, असे या चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपट ज्या पद्धतीने बनवला आहे, त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी नाग अश्विन यांच्या कल्पनाशक्ती आणि प्रतिभेचे कौतुक केले आहे. मात्र, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नाग अश्विन यांनी चित्रपटातील त्यांचा आवडता सीन कोणता यावर भाष्य केले आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत नाग अश्विन यांनी म्हटले आहे की, दीपिका जेव्हा आग लागलेल्या बोगद्यातून बाहेर येते, तो माझा सगळ्यात आवडता सीन आहे. महत्त्वाचे म्हणजे आम्ही तो खूप घाईत शूट केला होता. आम्ही तीन सेटअपवरती शूट करीत होतो आणि दीपिकाला त्याच दिवशी विमानाने जायचं होतं. चित्रपटाचे शूटिंग करताना कधीतरी सहज, घाईत खूप महत्त्वाच्या आणि सुंदर गोष्टी घडतात. तो सीनही तसाच झाला. खूप घाई होती, तणाव होता; पण जेव्हा तो सीन शूट झाला आणि मी तो मॉनिटरवर पाहिला, त्याच वेळी मला माहीत होतं की, हा सीन खूप खास होणार आहे. नाग अश्विन पुढे म्हणतात की, एक प्रकारे तो एका अद्भुत शक्तीला शरण जाण्याचा प्रकार होता. तो कृष्णजन्माचा संदर्भ होता. वासुदेवाने आपल्या श्रद्धेवर कसा विश्वास ठेवला होता हे सर्व त्या प्रसंगात होते. दीपिका एक हुशार अभिनेत्री आहे. तिला तुम्ही एखादी लहान गोष्ट जरी सांगितली तरी तिला माहीत आहे की, ती प्रत्यक्षात कशी उतरवायची आहे. दीपिकानं बोगद्याबाहेर आल्यावर जे शेवटचे हावभाव तिने प्रसंगात दाखविले होते, त्याचा मी आधी विचार केला होता.

हेही वाचा: ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अण्णा नाईक झळकणार नव्या रुपात! अशोक सराफ यांच्यासह काम करणार माधव अभ्यंकर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पौराणिक कथा आणि विज्ञान यांचा योग्य पद्धतीने मिलाफ करीत या चित्रपटात कथेला न्याय दिला गेल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या चित्रपटात बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचेदेखील मोठे कौतुक होताना दिसत आहे. त्याबरोबरच प्रभास, कमल हासन यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या दिग्गज कलाकारांबरोबरच मृणाल ठाकूर, दुलकिर सलमान, विजय देवरकोंडा, दिशा पटानी यांनीदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.