अनुराग कश्यप दिग्दर्शित २०१२ मध्ये आलेल्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने फैसल खान या गुंडाची भूमिका साकारली होती. यामधील त्याच्या भूमिकेने अनेकांचं लक्ष वेधलं होतं, तर तो आजही या भूमिकेसाठी ओळखला जातो. अशातच नवाजुद्दीनने या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला अनुराग कश्यपने दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलं आहे.

‘फिल्मफेअर’शी संवाद साधताना नवाजुद्दीनने ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या चित्रीकरणादरम्यान अनुराग कश्यपने दिलेल्या सल्ल्याबद्दल म्हणाला, “चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मी अल पचिनोला (अल पचिनो हे प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते आहेत) समोर ठेवून त्यांच्यासारखं काम करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. पण, तेव्हा अनुराग मला म्हणाला, तू वेडा झाला आहेस का? यामुळे तुझ्यातील वेगळेपण जाणवणार नाही आणि तू एकाच जागी अडकशील.” पुढे नवाजुद्दीन म्हणाला, “अनुरागने मला अल पचिनोसारखं न वागता तू स्वत:वर विश्वास ठेवून तू जसा आहेस तसं काम करं असं सांगितलं. जेव्हा मी पहिल्या दिवशी अल पचिनोसारखा अभिनय केला, तेव्हा अनुराग रात्री माझ्या खोलीत आला आणि म्हणाला तुला काय करायचं आहे नेमकं? तू अल पचिनोसारखा अभिनय नको करुस. मी त्याला म्हटलं मला शक्तिशाली दिसायचं आहे.”

नवाजुद्दीन पुढे म्हणाला, “तेव्हा अनुराग मला म्हणाला ते माझं काम आहे, तू माझ्यावर सोड. मी तुझ्यामागे सहा फूट उंच असलेल्या माणसांना उभं करेन, त्यातून तुझी ताकद दिसेल. त्यामुळे काही वेगळं करायला जावू नकोस, नेहमीसारखं काम कर. म्हणून तेव्हा ती पूर्ण रात्र मी झोपू शकलो नाही, कारण मला त्याचं म्हणणं पटलं होतं.” त्यामुळे “गँग्स ऑफ वासेपूर”मधील नवाजुद्दीनने साकारलेल्या भूमिकेचं श्रेय हे अनुराग कश्यपचं आहे. पुढे अभिनेता म्हणाला, “त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सगळं विसरलो आणि स्वत:ला सांगितलं की, बाकी सगळं जाऊदे, मी नवाज आहे आणि मी जसा आहे तसाच अभिनय करणार आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुराग कश्यप दिग्दर्शित “गँग्स ऑफ वासेपूर” हा चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला होता. यामध्ये नवाजुद्दीनसह अभिनेता मनोज बाजपेयी, हुमा कुरेशी, रिचा चड्ढा, पंकज त्रिपाठी, जयदीप अहलावत यांसारखे कलाकार झळकले होते. त्यावेळी या चित्रपटाचे समीक्षकांनीही कौतुक केलं होतं.