अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाला सहा दिवस झाले आहेत. २७ जून रोजी ‘कांटा लगा गर्ल’ने अखेरचा श्वास घेतला. पत्नीच्या निधनानंतर पहिल्यांदाच पराग त्यागीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. शेफालीवरचं प्रेम त्याने त्याच्या पोस्टमध्ये व्यक्त केलं आहे.
परागने शेफालीचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि भावनिक कॅप्शन लिहिलं. “सदैव अमर कांटा लगा गर्ल – तिला जेवढं सर्वांनी पाहिलं, त्यापेक्षा खूप वेगळी होती. ती आकर्षक, स्पष्टवक्ती होती. एक अशी महिला जी तिच्या ध्येयासह जगली. तिने तिचे करिअर, बुद्धीमत्ता, तिचे शरीर आणि तिच्या आत्म्याला शांत शक्ती आणि अढळ दृढनिश्चयाने पुढे नेलं. असं असलं तरी ती तिच्या सर्व कामगिरीच्या पलीकडे निस्वार्थ स्वरुपातलं प्रेम होती,” असं पराग म्हणाला.
पुढे त्याने लिहिलं, “ती सर्वांची आई होती – नेहमी इतरांना प्राधान्य देणारी, तिच्या उपस्थितीतून सर्वांना कंफर्ट व ऊब देणारी देणारी.
एक उदार मुलगी.
एक समर्पित आणि प्रेमळ पत्नी आणि सिम्बाची अद्भुत आई.
एक संरक्षक आणि मार्गदर्शक बहीण व मावशी.
एक अत्यंत प्रामाणिक मैत्रीण जी तिच्या जवळच्या लोकांच्या पाठीशी हिमतीने उभी राहिली.
दुःखाच्या गोंधळात इतरांच्या बोलण्यावर, अफवांवर विश्वास ठेवणं सोपं आहे. पण शेफालीने ज्या प्रकारे लोकांना फील करायला लावलं त्यासाठी तिला लक्षात ठेवायला हवं. तिने दिलेल्या आनंदासाठी आठवणीत ठेवायला हवं. तिने ज्या लोकांचे आयुष्य बदलले, त्यासाठी तिला लक्षात ठेवायला हवं.”
पाहा पोस्ट –
परागने शेवटी लिहिलं, “मी याची सुरुवात एका साध्या प्रार्थनेने करतोय. हे ठिकाण फक्त प्रेमाने भरलेले असू दे. अशा आठवणी ज्या जखमा भरतील. अशा कथा ज्या तिचा आत्मा जिवंत ठेवतील. हाच तिचा वारसा असू दे – एक तेजस्वी आत्मा. तिला कधीच कोणी विसरणार नाही. Love you till eternity.”
परागची ही पोस्ट वाचून चाहते व इंडस्ट्रीतील त्यांचे मित्र-मैत्रिणी भावुक झाले आहेत. प्रार्थना बेहेरेने पराग भाई असं लिहून रेड हार्ट इमोजी कमेंट केला आहे. तर आरती सिंह, अनिता हसनंदानी, निशा रावल, शोएब इब्राहिम, किश्वर मर्चंट, दिशा परमार, पारस छाब्रा, सोफी चौधरी, प्रतीक सेजपाल यांनी या पोस्टवर कमेंट्स करून परागला धीर दिला आहे.