Parag Tyagi Love for Late Wife Shefali Jariwala : आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अचानक जाण्याचं दुःख स्वीकारणं सोपं नसतं. अभिनेता पराग त्यागी सध्या अशाच कठीण काळातून जातोय. त्याची पत्नी शेफाली जरीवालाचं शुक्रवारी (२७ जून रोजी) निधन झालं. पराग व शेफालीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, शेफालीच्या निधनाआधी दोघांनी एकत्र अनेक मुलाखती दिल्या होत्या. त्या मुलाखतीतील व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. ते पाहून चाहते परागबद्दल काळजी व्यक्त करत आहेत.
शेफाली जरीवाला ‘बिग बॉस १३’ मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी परागने म्हटलं होतं की त्याला तिच्याशिवाय घरात करमत नाही. शेफाली बिग बॉसमध्ये असताना तिला किती मिस केलं, याबद्दल पराग व्यक्त झाला होता. शेफाली बिग बॉसच्या घरात गेल्यावर तिच्यावर माझं किती प्रेम आहे त्याची जाणीव झाली, असं पराग म्हणाला होता. ती बिग बॉसमध्ये असताना मला समजलं की ती माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे, कारण मला प्रत्येक क्षणी तिची आठवण यायची, असं परागने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं होतं.
मी रात्रभर जागायचो – पराग त्यागी
घरात शेफालीशिवाय करमत नव्हतं, एकटं वाटायचं. तसेच काहीतरी चांगलं घडलं की शेफालीची सर्वात जास्त आठवण यायची. “मी रात्रभर जागायचो आणि हे सगळं तिला कसं सांगायचं याचा विचार करत असे. ती नसताना मी काही गोष्टी माझ्या आई-वडिलांबरोबर शेअर करायचो, पण त्याआधी मात्र मी त्या सगळ्या गोष्टी नेहमीच तिच्याबरोबर शेअर करायचो आणि आता ती घरी नव्हती,” असं पराग म्हणाला होता.
बरेचदा परागची ओळख ‘शेफाली जरीवालाचा पती’ म्हणून केली जायची. त्यामुळे आपला कधीच अहंकार दुखावत नाही, असं पराग अभिमानाने सांगायचा. “मी खूप काम केलं आहे, पण शेफालीचा नवरा म्हणून ओळखलं जाण्यापेक्षा जास्त आनंद देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. याचा मला खूप अभिमान आहे,” असं पराग पुढे म्हणाला होता.
शेफाली जरीवालाला ‘कांटा लगा’ गाण्यातून प्रसिद्धी मिळाली. तिने २२ व्या वर्षी संगीतकार हरमीत सिंगशी लग्न केलं होतं होतं. २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. हरमीतपासून वेगळे झाल्यानंतर तिने पराग त्यागीला डेट करायला सुरुवात केली आणि अखेर २०१४ मध्ये दोघांनी लग्न केले. शुक्रवारी (२७ जून) मुंबईत ४२ व्या वर्षी तिचे निधन झाले.