अभिनेता हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरची मुख्य भूमिका असलेल्या ‘वॉर २’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्यापेक्षा अभिनेत्री कियारा अडवाणीच्या लूकची चर्चा रंगली आहे. १ मिनिट ३४ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये तिची झलक २ ठिकाणी दिसली, ज्यामध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे.

‘वॉर २’च्या टीझरमधील कियाराच्या बिकिनी लूकचीच सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. तिचे या बिकिनी लूकमधील अनेक फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कियाराच्या या बिकिनी लूकवरुन राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे त्यांना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आणि यामुळे त्यांनी ट्विटचं डिलीट केलं.

या ट्विटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी अभिनेत्रीवर अश्लील कमेंट केली होती. “देश आणि समाजाऐवजी जर हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्यात ही (कियारा) कोणाला भेटणार यावरुन वॉर झालं तर ‘वॉर २’ बॅकबस्टर असेल”, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. पण, त्यांच्या या ट्विटवरुन मात्र नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

राम गोपाल वर्मांचे कियारा अडवाणीबद्दलचं ट्विट
राम गोपाल वर्मांचे कियारा अडवाणीबद्दलचं ट्विट

राम गोपाल वर्मा यांची ही पोस्ट मंगळवारी रात्री उशिरा समोर आली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली, त्यानंतर त्यांना नेटकऱ्यांकडून तीव्र टीका सहन करावी लागली. अनेक नकारात्मक प्रतिक्रिया पाहून, राम गोपाल वर्मा यांनी बुधवारी सकाळी कोणतीही टिप्पणी न करता शांतपणे या पोस्ट काढून टाकल्या.

राम गोपाल वर्मा यांनी कियारा अडवाणीबद्दलचे त्यांचे ट्विट डिलीट केले असले, तरी त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने “हे सगळं तो जाहीरपणे बोलत आहे… तो प्रत्यक्षात कसा असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का?” तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “हा माणूस आता खूपच वाईट पातळीवर गेला आहे”. तसंच अनेकांनी त्यांना ‘विकृत म्हातारा’ असेही म्हटलं आहे.

कियारा अडवाणीने इन्स्टाग्रामवर ‘वॉर २’ बद्दल एक सकारात्मक आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले, “हे माझ्यासाठी अनेक प्रकारे पहल्यांदा आहे, माझा पहिला YRF (यश राज फिल्म्स) चित्रपट, पहिला अ‍ॅक्शन चित्रपट, या दोन अद्भुत नायकांबरोबर काम करण्याची पहिली संधी आणि हो, माझं पहिलं बिकिनी शूट देखील!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘वॉर २’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘वॉर’ चा सिक्वेल आहे. ‘वॉर २’ येत्या १४ ऑगस्ट २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात हृतिक, ज्युनियर एनटीआर आणि कियारा यांच्यासह अभिनेते आशुतोष राणादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.