Ranbir Kapoor Ramayana Movie : गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. निर्माते नमित मल्होत्राने त्यांच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ शेअर केला आहे.
तीन मिनिटं आणि तीन सेकंदांच्या टीझरमध्ये चित्रपटातील पात्रांची पहिली झलक पाहायला मिळाली. ही झलक पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे, तसंच या चित्रपटासाठी उत्सुकताही व्यक्त केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर राम आणि अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. तर लोकप्रिय टीव्ही अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे. रवी दुबेला लक्ष्मणाच्या भूमिकेत पाहताच त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
‘रामायण’ चित्रपटात रवी आधी असेल की नाही, याबद्दल साशंकता होती. पण ‘रामायण’च्या टीझरमध्ये रवी दुबेचं नाव पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसंच अभिनेत्याचासुद्धा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. याबद्दल त्याने टीझर शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेता रवी दुबे इन्स्टाग्राम पोस्ट
या पोस्टमध्ये अभिनेता असं म्हणतो, “पिढ्यानपिढ्या घडवणाऱ्या एका कथेचा भाग असणं, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. राम विरुद्ध रावणाची अजरामर कहाणी असलेल्या नमित मल्होत्राच्या ‘रामायण’मध्ये आपले स्वागत आहे. चला हा क्षण साजरा करूया आणि एकत्र येऊन या विलक्षण जगात पाऊल ठेवूया.” त्याची पत्नी शरगुन मेहता हिनेही रवी दुबेचं कौतुक केलं आहे.
रवी दुबे पत्नी शरगुन मेहता इन्स्टाग्राम पोस्ट
शरगुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘रामायण’चा टीझर शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे, “२०२६ मधील आगामी दिवाळीची वाट पाहणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझं हृदय आनंदानं भरून आलं आहे. जेव्हा जेव्हा मी हा टीझर पाहतेय आणि त्यामधील नावं वाचतेय, तेव्हा तेव्हा मला केवळ आनंद आणि अभिमान वाटत आहे. याबद्दल देवाचे खूप खूप धन्यवाद.”
दरम्यान, रवी दुबेबद्दल सांगायचं झालं तर, त्याने त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात ‘स्त्री… तेरी कहानी’ या मालिकेतून केली. त्यानंतर, त्याने ‘सास बिना ससुराल’ आणि ‘जमाई राजा’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. याशिवाय तो ‘मत्स्य कांड’ आणि ‘लखन लीला भार्गव’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसला आहे. तसंच रवीने अनेक रिॲलिटी शोमध्येही काम केले आहे. त्यानंतर आता तो ‘रामायण’मध्येहे दिसणार आहे.