बॉलिवूडच्या पुढील पिढीचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. गेल्यावर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ चांगलाच आपटला असला तरी त्यापाठोपाठ आलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ने सगळी कमी भरून काढली अन् २०२३ च्या अखेरीस आलेल्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाने तर रणबीर कपूरला लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर नेऊन बसवलं. या चित्रपटावर भरपुर टीकाही झाली, पण बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने ९०० कोटींची कमाई केली.

इतर कलाकारांप्रमाणे बॉलिवूडचा हा सुपरस्टार मात्र कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान रणबीरने तो सोशल मीडियावर का नाही यावर भाष्य केलं होतं. पण आता मात्र रणबीर छुप्या पद्धतीने सोशल मीडिया वापरतो ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. ‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका युझरने नुकतंच रणबीरच्या या फेक अकाऊंटचा उलगडा केला आहे.

आणखी वाचा : ‘या’ कारणासाठी आता प्रभास राहणार लंडनमध्ये भाड्याच्या घरात; भाड्याची रक्कम ऐकून व्हाल चकित

रेडिटच्या युझरने शेअर केलेल्या माहितीनुसार ‘reymar_1528’ हे रणबीर कपूरचे अकाऊंट आहे, अन् या अकाऊंटच्या माध्यमातून रणबीर सगळ्यांच्या अपडेटवर लक्ष ठेवून असतो असा दावा या युझरने केला आहे. इतकंच नव्हे या युझरच्या नावातच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या वाढदिवसाच्या तारखा पाहायला मिळत असल्याचा खुलासाही लोकांनी केला आहे. २८ सप्टेंबर आणि १५ मार्च ही तारीख आपल्या या युझरनेममध्ये पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे रणबीरच्या ‘वेक अप सिड’, ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘ब्रह्मास्त्र’सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक अयान मुखर्जीदेखील या अकाऊंटला फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.”

ranbirkapoor-social-media1
फोटो : रेडिट

याच नावाचं अकाऊंट ट्विटरवरही असल्याचा खुलासा या युझरने केला असून रणबीर कपूर व पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्यात या अकाऊंटच्या माध्यमातून झालेल्या सांभाषणाचाही फोटो समोर आला आहे. रणबीरला बऱ्याचदा या अकाऊंटबद्दल विचारणा झालेली आहे पण दरवेळी त्याने ही गोष्ट हसून उडवून लावली.

ranbirkapoor-social-media2
फोटो : रेडिट

इतकंच नव्हे तर रणबीर कपूरची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिनेदेखील बऱ्याचदा रणबीर एका सीक्रेट अकाऊंटवरुन सगळ्यांवर लक्ष ठेवून असल्याचं स्पष्ट केलं आहे. रणबीरच्या वाढदिवशी आलिया भट्टने एक पोस्ट शेअर करत लिहिलं होतं, “माझं प्रेम, माझा बेस्टफ्रेंड, माझी सर्वात आनंदी जागा…मला माहितीये की तू माझ्या बाजूला बसून तुझ्या सीक्रेट अकाऊंटच्या माध्यमातून हे कॅप्शन वाचत आहेस…तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.” आलियाच नव्हे तर बॉलिवूडमधील इतरही सेलिब्रिटीजनी रणबीर छुप्या पद्धतीने सोशल मीडिया अकाऊंटचा वापर करतो याचा खुलासा केला आहे.