बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळीबार झाला. दुचाकीवर आलेल्या दोघांनी घरावर गोळ्या झाडल्या. घरासमोरील सीसीटीव्ही फुटेजमधून या दोन हल्लेखोरांबद्दल माहिती कळली. हे सगळं केवळ प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचं सलमान खानचे वडील सलीम खान यांनी म्हटलं अशा चर्चा सुरू होत्या. परंतु या हल्ल्यानंतर खान कुटुंबातील कोणत्याही सदस्याने याबद्दल भाष्य केलं नसल्याचं अरबाज खानने सांगितलं.

अरबाज खानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात अरबाजने लिहिलं, “मोटारसायकलवर असलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना नुकतीच सलीम खान यांचं निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घडली. आमचे संपूर्ण कुटूंब यामुळे खूप अस्वस्थ आहे. या धक्कादायक घटनेने कुटुंबीय हादरले आहेत. दुर्दैवाने काही लोक अशी आहेत जी आमच्या कुटुंबाच्या अगदी जवळची आहेत असं भासवून माध्यमांसमोर विधान करतायत आणि हा एक पब्लीसिटी स्टंट आहे आणि यामुळे आम्हाला कोणताही त्रास झाला नाही असा दावा करतायत. या विधानांना गांभीर्याने घेतले जाऊ नये. “

अरबाज खानने पुढे लिहिलं, “सलीम खान कुटूंबातील कोणत्याही सदस्याने या घटनेबाबत अधिकृत विधान किंवा माहिती अद्याप दिली नाही आहे. या वेळेस संपूर्ण कुटूंब या दुर्दैवी घटनेसाठी पोलिसांना तपासात सहकार्य करत आहे.”

हेही वाचा… धोनीचा षटकार पाहून नेहा धुपिया झाली अवाक, तर करीना कपूरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

“आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे आणि आमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी ते त्यांच्या क्षमतेनुसार सर्व काही करतील, असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार.” असंही अरबाजने नमूद केलं.

हेही वाचा… भूमी पेडणेकर व तिच्या बहिणीला ‘त्या’ व्हिडीओवरून नेटकऱ्याने केले ट्रोल; समीक्षा सडेतोड उत्तर देत म्हणाली, “एकच सर्जन की एकच पालक?”

सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत सलमान खानशी संवाद साधला होता. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी संध्याकाळी अभिनेत्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.