Salman Khan and Aishwarya Rai: ऐश्वर्या राय व सलमान खान यांचे ब्रेकअप होऊन बरीच वर्षे उलटली आहेत. हे कलाकार आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगी आहे.

असे असले तरी आजही अनेकदा ऐश्वर्या व सलमान खानबद्दल बोलले जाते. आता चित्रपट निर्माते रतन जैन यांनी सलमान खानला एका चित्रपटात ऐश्वर्याच्या भावाच्या भूमिकेसाठी विचारले होते, असा खुलासा केला आहे.

“मी स्पष्ट नकार देत सांगितले की…”

रतन जैन यांनी नुकतीच टीव्ही ९ भारतवर्षला मुलाखत दिली. जोश चित्रपटाच्या कास्टिंगबाबत त्यांनी खुलासा केला. ते म्हणाले, “आम्ही ठरवलं होतं की चंद्रचूर सिंगने जी भूमिका साकारली आहे, ती भूमिका आमिर खान करेल आणि शाहरुख खान मॅक्स ही भूमिका साकारेल. पण, मन्सूर खान यांनी मला सांगितलं की आमिर खानला मॅक्स ही भूमिका साकारायची आहे. मी स्पष्ट नकार देत सांगितले की फक्त शाहरुखच ही भूमिका साकारेल, नाहीतर मी हा चित्रपट करणार नाही.”

शाहरुख खान जी भूमिका साकारणार होता, तीच भूमिका आमिरला पाहिजे असे शाहरुखने ऐकले होते, त्यामुळे त्याने सर्वांनी एकत्र येऊन कथा वाचली पाहिजे असे सुचवले. चित्रपटाची कथा वाचण्यास सुरुवात होण्याआधी मन्सुरने आमिरला मॅक्स ही भूमिका साकारायची आहे असे सांगितले. ते ऐकल्यानंतर शाहरुख खानने त्याचे बूट घातले आणि सांगितले, मग मी हा चित्रपट करणार नाही, तो निघून गेला.

रतन जैन यांनी पुढे सांगितले की, शाहरुख आणि आमिर खान दोघेही चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर काही दिवस चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. त्यानंतर सलमान खानला चित्रपटासाठी विचारण्यात आले, तर त्याने होकार दिला. म्हणजेच त्याने ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका साकारण्यास होकार दिला होता.

त्याच दरम्यान संजय लीला भन्साळी यांनी त्याला ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाची ऑफर दिली होती. जरी सलमान खानने जोश चित्रपटाला होकार दिला असला. तरी तो संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाकडे जास्त झुकलेला वाटला. त्यामुळे मी पुन्हा शाहरुखला चित्रपटाबद्दल विचारले. त्याने थोडा विचार करून या चित्रपटाला होकार दिला.

ऐश्वर्याच्या कास्टिंगबद्दल विचारले असता, रतन जैन यांनी सांगितले की ती आधीच चित्रपटाचा भाग होती. चित्रपटात भावंडांची भूमिका साकारल्यानंतर शाहरुख आणि ऐश्वर्याने मोहब्बतें या चित्रपटात प्रियकर व प्रेमिकाच्या भूमिकेत दिसले होते. दरम्यान, हम दिल दे चुके सनम चित्रपटात ऐश्वर्या व सलमान यांनी स्क्रीन शेअर केली होती.