This Bollywood Actor Says Shah Rukh Khan Is Boring : शाहरुख खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. पण, फक्त प्रेक्षकांचाच नाही तर तो अनेक कलाकारांचाही आवडता अभिनेता आहे. परंतु, असं असताना एका बॉलीवूड अभिनेत्याने मात्र त्याला बोरिंग म्हणत त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

शाहरुख खानचं अनेक कलाकार कौतुक करताना दिसतात. त्याच्याबरोबर काम करण्यासाठी नवोदित कलाकारांपासून ते लोकप्रिय कलाकारांपर्यंत सर्व जण उत्सुक असतात. अशातच त्याच्याबरोबर ‘हॅपी न्यू इयर’ या गाजलेल्या चित्रपटात काम केलेले अभिनेते बोमन इराणी यांनी त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शाहरुखबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, “शाहरुख खान सेटवर खूप आनंदी असतो. त्याला लोकांबरोबर राहायला आवडतं. मी त्याची वेगळी बाजू पाहिलेली आहे. जिथे तो खूप मस्ती करायचा. शाहरुख खान सेटवरील सहकलाकारांबरोबर गेम खेळतो. तो असला की सेटवर कायम आनंदी वातावरण असतं.”

शाहरुख खान खूप बोरिंग आहे बुमन इराणी यांचं वक्तव्य

बोमन इराणी म्हणाले, शाहरुख खान त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ते म्हणाले, “तो त्याच्या सहकलाकारांना कधीच तो स्टार आहे असं वाटू देत नाही. पण, त्याच्याबद्दल एक तक्रार आहे. तो खूप बोरिंग आहे. त्याला फक्त तंदुरी चिकन खायला आवडतं आणि तो दुसरं काहीही खात नाही. तो असं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणारा व्यक्ती नाही. जेव्हा आम्ही कुठे एकत्र जातो, तेव्हा सगळे त्यांच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारत असतात, पण शाहरुख मात्र असाच बसलेला असतो, त्यामुळे मला त्याच्याबद्दल ही तक्रार आहे.”

शाहरुख खानने आरजे देवनगना (RJ Devangana)ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितलेलं. तो म्हणालेला, “मला खूप साधं जेवण आवडतं. मी दिवसातून फक्त दोन वेळा जेवतो. त्याव्यतिरिक्त मी काहीही खात नाही. मला फार वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण आवडत नाही. मी कडधान्य खातो, चिकन खातो, भाज्या खातो; मी कित्येक वर्षे हेच खात आलो आहे.”