अभिनेता शाहरुख खान आणि त्याची लोकप्रियता या दोन गोष्टी कधीही वेगळ्या करता येऊ शकत नाहीत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते वेडे असतात. शाहरुख खान गेले काही दिवस त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चर्चेत होता. आता तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. मुंबई विमानतळावर त्याची अडवणूक करण्यात आली आहे.
शनिवारी शाहरुख खान शारजाहवरून परत येत असताना त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी रोखले आणि त्याची चौकशी केली. कस्टम ड्युटी न भरल्याने ही चौकशी करण्यात आली आहे. एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) च्या सूत्रांनुसार त्याच्याकडे महागडया घडाळ्यांची कव्हर्स होती ज्याची किंमत जवळपास १८ लाख आहे, ज्याचे कस्टम शुल्क आहे ६. ८३ लाख. अभिनेत्याने ही रक्कम दंड स्वरूपात भरली असून कस्टम अधिकाऱ्यांना सहकार्यदेखील केले आहे. शाहरुख खान ४१ व्या शारजाह इंटरनॅशनल बुक फेअर या कार्यक्रमातून परतत होता.
शुक्रवारी शाहरुख खानला शारजाहमधील एक्स्पो सेंटरमधील पुस्तक मेळ्यात उपस्थित असताना ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नॅरेटिव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शाहरुख खान पठाणच्या बरोबरीने ‘जवान’ ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे ‘डंकी’ या चित्रपटातून तो पहिल्यांदा दिग्दर्शक राजू हिरानी यांच्याबरोबर काम करताना दिसून येणार आहे.