अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. तिचे कुटंबीय, जवळचे मित्र आणि नातेवाईकांनी तिला अखेरचा निरोप दिला. शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीने तिच्या मृत्यूबद्दल पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला आणि तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. दुसरीकडे, पोलीस अभिनेत्रीच्या मृत्यूचा तपास करत आहेत.

शेफाली जरीवालाचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफाली जरीवालाच्या घरात अनेक औषधं सापडली आहेत. काही वर्षांपूर्वी शेफालीनेही प्लास्टिक सर्जरी केली होती, त्यानंतर ती तरुण दिसण्यासाठी सतत अँटी-एजिंग इंजेक्शन्स घेत होती. पोलिसांना संशय आहे की इतकी औषधं आणि अँटी-एजिंग इंजेक्शन्स शेफाली जरीवालाच्या हृदयविकाराचे कारण असू शकतात, परंतु ते शेफाली जरीवालाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत, त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण कळेल.

औषधांचा फक्त त्वचेवर परिणाम होतो – डॉक्टर

शेफाली अँटी-एजिंग ट्रीटमेंट घेत होती, म्हणजेच ती तरुण दिसण्यासाठी काही औषधं घेत होती. शेफाली दोन औषधं घेत होती, त्यापैकी एक व्हिटॅमिन सी आणि दुसरे ग्लुटाथिओन (Glutathione) होय. पण या औषधाचा हृदयाशी काहीही संबंध नाही. ही औषधे त्वचा गोरी व्हावी यासाठी घेतली जातात, त्याचा परिणाम फक्त त्वचेवर होतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यासंदर्भात एबीपी लाइव्हने वृत्त दिलं आहे.

शेफाली जरीवालाने शुक्रवारी घरी सत्यनारायणाची पूजा केली होती. संध्याकाळी ६ वाजल्यानंतर तिची प्रकृती बिघडू लागली. शेफालीचा रक्तदाब वाढला आणि ती बेशुद्ध पडली, त्यानंतर तिला पती पराग त्यागीने अंधेरी येथील बेली व्ह्यू रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेफालीचा मृतदेह नंतर कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. पराग व शेफालीचे कुटुंबीय रुग्णालयात होते. शवविच्छेदनानंतर शनिवारी दुपारी तिचे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्यात आले. शेफालीवर संध्याकाळी ओशिवारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिला अखेरचा निरोप देताना पराग, शेफालीचे आई-वडील तसेच तिचे मित्र भावुक झाले.