Sky Force Box Office Collection Day 3: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारियाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तो अक्षय कुमारबरोबर ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘स्काय फोर्स’ शुक्रवारी (२४ जानेवारीला) प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तीन दिवसांत चांगली कमाई केली आहे. ‘स्काय फोर्स’च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

‘स्काय फोर्स’ हा देशभक्तीपर चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे त्याच्या तीन दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून दिसत आहे. ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या प्रत्युत्तराच्या हल्ल्याची कथा आहे.

‘स्काय फोर्स’ चे कलेक्शन किती?

‘स्काय फोर्स’ने दमदार ओपनिंग केली. या सिनेमाने पहिल्या दिवशी, शुक्रवारी १५.३० कोटी रुपयांची कमाई केली. मग दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली. चित्रपटाने शनिवारी २६.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दोन दिवसांत या चित्रपटाचे कलेक्शन ४१.६० कोटी रुपये झाले. आता या सिनेमाच्या पहिल्या रविवारचे आकडे समोर आले आहेत. २६ जानेवारीला या चित्रपटाने आधीच्या दोन्ही दिवसांपेक्षा जास्त कमाई केली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने रविवारी ३१.६० कोटी रुपये कमावले आहेत. ही प्रारंभिक आकडेवारी आहे. या चित्रपटाचे भारतातील कलेक्शन ८६.४० व जगभरातील कलेक्शन ९२.९० कोटी रुपये झाले आहे.

‘स्काय फोर्स’चे बजेट किती?

अक्षय कुमारने ‘स्काय फोर्स’ची घोषणा २ ऑक्टोबर २०२३ रोजी म्हणजेच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त केली होती. घोषणेनंतर जवळपास १५ महिन्यांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी खूप पैसे खर्च केले आहेत. ‘स्काय फोर्स’चे बजेट तब्बल १६० कोटी रुपये आहे. ‘स्काय फोर्स’ने तीन दिवसांत चांगली कमाई केली आहे, पण तो निर्मितीखर्च वसूल करू शकतो की नाही, ते येत्या काळातच कळेल.

‘स्काय फोर्स’मधील कलाकार

‘स्काय फोर्स’ अक्षय कुमार व वीर पहारिया यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच सारा अली खान, निम्रत कौर, बोगुमिला बुबैकदेखील या चित्रपटात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीर पहारिया कोण आहे?

‘स्काय फोर्स’ मधून बॉलीवूड पदार्पण करणारा वीर पहारिया हा जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाचा भाऊ आहे. तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. खासदार प्रणिती शिंदे या वीरच्या मावशी आहेत.