बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्र व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमातील दोघांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे यांचा २० वर्षांपूर्वी सोनालीवर क्रश होता, अशा चर्चा रंगल्या होत्या. आता सोनाली बेंद्रेने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे व तिच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा सोनाली बेंद्रेने फेटाळून लावल्या. एएनआयशी बोलताना सोनालीला त्यासंदर्भात विचारण्यात आलं.”खरंच का… मला शंका आहे का,” असं म्हणत तिने त्या व्हिडीओबद्दल स्पष्टीकरण दिलं, ज्यात ती राज ठाकरेंना इशारा करतेय असं म्हटलं जात होतं. सोनाली म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी बोलत होते, तीही तिथेच होती.”
“मला माहीत नाही. पण, बरेच लोक… जेव्हा याबद्दल असं बोलतात तेव्हा मला ते अजिबात आवडत नाही. महत्त्वाचं म्हणजे आमची कुटुंबे आणि इतरही बरेच लोक यात इनवॉल्व्ह आहेत,” असं सोनाली म्हणाली.
व्हायरल व्हिडीओ-
सोनाली व राज यांच्या कुटुंबाचे संबंध
सोनाली बेंद्रे म्हणाली की तिच्या व राज ठाकरेंच्या कुटुंबाचे संबंध खूप जुने आहेत. “माझे भाऊजी एक क्रिकेटपटू आहेत आणि ते राज यांच्या चुलत बहिणीच्या पतीबरोबर क्रिकेट खेळायचे. ते नेहमीच एकत्र खेळायचे. दुसरं म्हणजे, माझ्या बहिणीच्या सासूबाई एचओडी होत्या, त्या आम्हाला रुईया कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्य शिकवायच्या,” असं सोनालीने नमूद केलं.
सोनाली कौटुंबिक संबंधांबद्दल म्हणाली, “अशा रितीने ते सर्व एकमेकांना ओळखत होते. माझ्यासाठी, नातं असं होतं की राज यांची पत्नी शर्मिला, त्यांची आई आणि माझी मावशी या खूप जवळच्या मैत्रिणी होत्या. ते सगळे मला रुग्णालयात बघायला आले होते आणि शर्मिला यांच्या आईने मला १० दिवस सांभाळलं होतं.”
सोनाली बेंद्रे म्हणाली, “मी नेहमीच फिरत असायचे. त्यामुळे मी त्यांना एका मर्यादेपलीकडे ओळखत नाही. कारण मी उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे कधीतरी दोन वर्षातून एकदाच महाराष्ट्रात येत असे.” दरम्यान, राजकारण यायची अजिबात इच्छा नसल्याचंही सोनालीने या मुलाखतीत स्पष्ट केलं.