श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी १९९६ मध्ये लग्न केलं होतं. त्यांचं लग्न वादग्रस्त ठरलं होतं, कारण त्यांनी श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी पहिली पत्नी मोना शौरी हिला सोडलं होतं. मोनापासून त्यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन अपत्ये होती. नंतर बोनी कपूर यांना श्रीदेवीपासून जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली झाल्या.

श्रीदेवी आणि बोनी कपूर हे लग्नापूर्वीही चांगले मित्र होते. एकदा बोनी यांनी श्रीदेवीला घरी राहण्यासाठी आमंत्रित केलं होतं. एका मुलाखतीत पत्रकार आणि लेखक हनीफ झवेरी यांनी याबद्दल सांगितलं आहे. “लोकांना वाटतं की बोनी व श्रीदेवी यांचं अफेअर मिस्टर इंडिया सिनेमादरम्यान झालं. पण ते खरं नाही. श्रीदेवी चेन्नईहून मुंबईत येत असे. मुंबईत तिचं घर नव्हतं, म्हणून ती सी रॉक हॉटेलमध्ये थांबायची. एके दिवशी, हॉटेलच्या लिफ्टमध्ये कोणीतरी तिच्याशी गैरवर्तन केलं. नंतर पुन्हा कधीही तिने त्या हॉटेलमध्ये राहणार नाही, अशी शपथ घेतली. मग ती जुहूमधील एका हॉटेलमध्ये राहू लागली,” असं हनीफ म्हणाले.

मोना शौरी घ्यायची श्रीदेवीची काळजी

श्रीदेवीच्या आईच्या पायाची शस्त्रक्रिया करायची होती, त्यावेळी बोनी कपूर यांनी अमेरिकेत उपचारांसाठी व्यवस्था करण्याची ऑफर दिली होती. याच काळात बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना त्यांच्या घरी राहण्यासाठी आमंत्रित केलं होतं. “श्रीदेवी कपूर कुटुंबाच्या घरी राहायला गेली. तेव्हा त्यांचे कुटुंब संयुक्त होते आणि सर्वजण एकाच घरात राहायचे. बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर श्रीदेवीची खूप काळजी घ्यायची. कारण श्रीदेवी पाहुणी होती,” असं हनीफ म्हणाले.

बोनी कपूर यांनी नुकतंच याबद्दल सांगितलं होतं. मुंबई बॉम्बस्फोट झाल्यानंतर आपण श्रीदेवीला घरी राहण्याचं आमंत्रण दिलं होतं, असं ते म्हणाले होते. “जेव्हा श्रीदेवी माझ्या घरी आली, तेव्हा बॉम्बस्फोट झाले होते. जेव्हा ती पाहुणी म्हणून घरी राहिली होती, तेव्हा अर्जुनचे ती खूप लाड करायची. काय चाललंय ते अर्जुनला कळायचं नाही. काही वेळी आपण ठरवतो, त्याप्रमाणे गोष्टी घडत नाही. तेव्हा श्रीदेवी हॉटेल सी रॉकमध्ये राहायची. मला जेव्हा बॉम्बस्फोटांबद्दल समजलं, तेव्हा मी ताबडतोब तिच्या आईला फोन केला आणि श्रीदेवी आता हॉटेलमध्ये राहणार नाही असा आग्रह धरला. मी तिला घरी आणण्यासाठी माझे कर्मचारी पाठवले. त्यानंतर, मे १९९३ मध्ये ‘रूप की रानी’ प्रदर्शित होईपर्यंत श्रीदेवी माझ्या घरीच राहिली,” असं बोनी कपूर यांनी सांगितलं होतं.

श्रीदेवीबरोबरच्या अफेअरबद्दल बोनी कपूर यांनी स्वतः पहिली पत्नी मोनाला सांगितलं होतं. “माझ्या पहिल्या पत्नीसमोर मी श्रीदेवीवरील प्रेमाची कबुली दिली होती,” असं ते म्हणाले. बोटातील अंगठी दाखवत म्हणाले. “मी घातलेली ही अंगठी आणि तिने (श्रीदेवी) घातलेली अंगठी पाहा. दोन्ही मोनाने विकत घेतल्या होत्या. मोनाने माझ्या किंवा श्रीदेवीबद्दल मनात कोणताही द्वेष न ठेवता माझ्या मुलांना वाढवलं,” असं बोनी कपूर यांनी नमूद केलं.