सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित चित्रपट ‘टायगर ३’ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. ‘टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’प्रमाणेच या चित्रपटातही प्रेक्षकांना सलमान खानचे अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. अगोदरच्या दोन्ही चित्रपटांची कमाई पाहता ‘टायगर ३’सुद्धा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करेल अशी चर्चा सुरू आहे.
हेही वाचा- सलमान खानच्या ‘टायगर ३’ वर येणार ‘विराट’ संकट?; पहिल्याच दिवशी चित्रपटाला बसू शकतो फटका
अॅडव्हॉन्स बुकिंगमधून चित्रपटाची मोठी कमाई
भारतात ‘टायगर ३’च्या अॅडव्हॉन्स बुकिंगला ५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरुवात झाली. अॅडव्हॉन्स बुकिंग सुरू झाल्यापासून २४ तासांमध्ये ‘टायगर ३’ची सुमारे एक लाख ४० हजार तिकिटे विकली गेली होती. आत्तापर्यंत या चित्रपटाची सुमारे तीन लाख तिकिटे विकली गेली आहे. अॅडव्हॉन्स बुकिंगमध्ये ‘टायगर ३’ने आतापर्यंत १० कोटींची कमाई केली आहे.
ॲडव्हाॅन्स बुकिंग पाहता पहिल्याच दिवशी हा चित्रपट मोठी कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. चित्रपट निर्माते गिरीश जोहर यांनी ‘टायगर ३’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे अंदाज व्यक्त केले आहेत. गिरीश जोहर यांच्या मते ‘टायगर ३’ पहिल्याच दिवशी भारतात जवळपास ३५ कोटींची कमाई करू शकतो, तर जगभरात १०० कोटींचा व्यवसाय करण्याची शक्यता आहे. तर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५७ कोटींचा, तर ‘जवान’ने ७५ कोटींचा व्यवसाय केला होता.
२४ तास दाखवणार ‘टायगर ३’चे शो
‘टायगर ३’ला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता दिल्लीतील अनेक चित्रपटगृहांमध्ये ‘टायगर ३’ चे २४ तास शो चालवण्यात येणार आहेत. मध्यरात्री २ वाजता या चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीप्रमाणे इतर शहरातील प्रेक्षकांनी हा चित्रपट २४ तास दाखवण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा- Video: “आता मला मराठी येते आणि मी…”, आयरा खानने होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा
‘टायगर ३’ चित्रपटात सलमान, कतरिनाबरोबरच इमरान हाश्मीचीही मुख्य भूमिका आहे. इमरानने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान आणि कतरिनाबरोबर इमरानचेही ॲक्शन सीन्स बघायला मिळाणार आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ हिंदीबरोबरच तामीळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.