शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तस तशी प्रेक्षकांच्या मनातील या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढताना दिसत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट चर्चेत आला होता. तसंच प्रदर्शनाच्या आधीच हा चित्रपट विक्रमी कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळेच पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट मोठा गल्ला जमवेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून शाहरुख खान चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. आतापर्यंत भारतात या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची २ लाख ६५ हजार तिकीट विकली गेली आहेत. तर या २ दिवसात हा आकडा आणखीन वाढेल असं बोललं जात आहे.
आणखी वाचा : ‘पठाण’ने मोडला ऑस्करच्या शर्यतीत आलेल्या ‘आरआरआर’चा रेकॉर्ड, ‘या’ बाबतीत चित्रपटाला टाकलं मागे
चित्रपट निर्माते आणि चित्रपट समीक्षक गिरीश जोहर यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं, “या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे ‘पठाण’ला मिळत असलेल्या या प्रतिसादामुळे बॉलिवूडचा आत्मविश्वास परत मिळण्यास मदत होणार आहे. या चित्रपट पहिल्या दिवशी ३५ ते ३८ कोटीचा गल्ला जमवेल असं मला वाटतं. त्याचप्रमाणे चित्रपट पहिल्याच आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करेल याची मला खात्री आहे. हा चित्रपट भारतात पहिल्या पाच दिवसांतच १७५ ते २०० कोटींचा गल्ला जमवेल तर जगभरातून हा चित्रपट ३५० कोटींची कमाई करू शकतो.”
दरम्यान ‘पठाण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.