सनी देओल, अमिषा पटेल व उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करीत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, पाटण्यामध्ये ‘गदर २’ चित्रपटावरून मोठा गोंधळ उडाला आहे.
हेही वाचा- ‘गदर २’ ने ३०० कोटींचा टप्पा केला पार, ‘गदर ३’ चित्रपटाबद्दल सनी देओलने दिली मोठी अपडेट; पाहा VIDEO
बॉलीवूड हंगामाच्या बातमीनुसार, पाटण्यामध्ये ‘गदर २’च्या तिकिटांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने चित्रपटगृहांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. हा गोंधळ इतका वाढला की, दोन संशयितांनी चित्रपटगृहाच्या बाहेर कमी तीव्रतेचे बॉम्ब फेकले. त्यापैकी एका बॉम्बचा स्फोट झाला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
चित्रपटगृहाचे मालक सुमन सिन्हा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार- संशयितांना ‘गदर २’ची तिकिटे ‘ब्लॅक’मध्ये विकायची होती; परंतु कर्मचाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही तेव्हा हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला. अशा घटना सतत होत असतात. लोक वाईट हेतूने येतात. आम्ही त्यांना चित्रपटाच्या तिकिटांचा काळाबाजार करू द्यावा, अशी त्यांची इच्छा होती; ज्यासाठी आम्ही तयार नव्हतो.
‘गदर २’च्या कमाईबाबत बोलायचे झाले तर, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ४०.१ कोटींची कमाई करीत नवा रेकॉर्ड निर्माण केला होता. या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका आहेत. २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘गदर एक प्रेमकथा’चा हा सिक्वेल आहे.