69th National Film Awards: ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे करण्यात आली होती. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. काल म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.

हिंदी चित्रपटसृष्टीतील तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांना यंदा पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘पुष्पा’फेम अल्लू अर्जुनला मिळाला. तर उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट व क्रीती सेनॉन यांना ‘गंगूबाई काठियावाडी’ व ‘मीमी’साठी विभागून देण्यात आला. याबरोबरच ‘मीमी’ चित्रपटासाठी पंकज त्रिपाठी यांनादेखील सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला या सगळ्या दिग्गजांनी हजेरी लावली.

आणखी वाचा : 69th National Film Awards: दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना वहिदा रेहमान झाल्या भावुक; म्हणाल्या, “हा पुरस्कार…”

याबरोबरच विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ला राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार देण्यात आला. तर करण जोहरला ‘शेरशाह’ चित्रपटासाठी स्पेशल ज्यूरी पुरस्कार देण्यात आला. यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली जी चांगलीच चर्चेत आहे. या सोहळ्यादरम्यानचे काही फोटोज विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले. यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सगळ्या कलाकारांचा एक ग्रुप फोटोदेखील आपल्याला पाहायला मिळाला.

या फोटोमध्ये विवेक यांनी करण जोहरला क्रॉप केल्याने याची चर्चा अधिक होताना दिसत आहे. या फोटोमध्ये बहुतेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले सगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळतील, पण नेमकं करण जोहरलाच या फोटोमधून बाहेर काढल्याने विवेक अग्निहोत्री यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. विवेक अग्निहोत्री यांनी याआधीही करण जोहर शाहरुख खान यांना चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांची दिशाभूल केल्याचे आरोप केले होते.