७० च्या दशकातील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री झीनत अमान यांनी मॉडलिंगपासून आपल्या करिअरची सुरवात केली होती. झीनत अमान या हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा एक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये आधुनिकतेचा पाया रचला. ‘हलचल’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या झीनत यांनी ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटात देव आनंद यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. करिअरमध्ये यशस्वी झालेल्या झीनत यांचं वैवाहिक आयुष्य मात्र नेहमीच चर्चेत राहिलं. मजहर खानशी त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही.

७१ वर्षीय झीनत अमान सध्या त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. झीनत यांनी मोठ्या पडद्यावर खूप यश मिळवलं मात्र त्यांचं वैवाहिक आयुष्य यशस्वी होऊ शकलं नाही. त्यांना वैवाहिक आयुष्यात फसवणूक, विश्वासघात आणि हिंसाचाराचा सामना करावा लागला. आपल्या आयुष्याबद्दल झीनत अमान सांगतात लग्न करून आयुष्य त्रासात काढण्यापेक्षा लग्न न केलेलं केव्हाही चांगलं.

आणखी वाचा- ७०-८० च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री झीनत अमान यांची नवी सुरुवात; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

‘एबीपी’ चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत झीनत अमान यांना बॉलिवूडमध्ये सर्वाधिक जोडप्यांचे घटस्फोट का होतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी खूपच आश्चर्यचकीत करणारं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. जर ती टिकणार असतील तर नक्कीच टिकतील. पण काही गोष्टी आपल्या नशीबात नसतात त्यामुळे त्या आपल्याला मिळत नाहीत. मला वाटतं मी माझ्या आयुष्यात खुश आहे.”

बॉलिवूड कलाकारांच्या वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या समस्यांबद्दल बोलताना झीनत अमान म्हणाल्या, “एक गोष्ट लोकांच्या लक्षात येत नाही ती म्हणजे जेव्हा ते एका कलाकाराशी लग्न करतात तेव्हा ते हे लग्न टिकवण्यासाठी खूप मेहनत करतात. ते लग्न यासाठी करतात कारण त्यांना ते करायचं असतं. मी काही मुलींना ओळखते त्यांनी लग्न टिकवण्यासाठी अशा गोष्टी केल्या आहेत ज्या सामान्य व्यक्तीही करणार नाही.”

आणखी वाचा- “जबरदस्तीने मांड्या दाखवून…”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे आलिया भट्ट झाली ट्रोल

दरम्यान झीनत अमान आधुनिक विचारसारणीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. विदेशात शिक्षण घेतलेल्या झीनत आणि संजय खान यांच्या अफेअरच्या त्या काळात बऱ्याच झाल्या होत्या. त्यांनी गुपचूप लग्नही केलं. मात्र असं म्हटलं जातं की संजय खान यांच्याबरोबर झीनत यांचं नातं खूपच वेदनादायी राहिलं. संजय यांनी झीनम अमान यांना खूप मारहाण केली होती.