दूरदर्शनवरील गाजलेली पौराणिक मालिका ‘रामायण’ मधील ‘आर्य सुमंत’ची भूमिका साकारणारे आणि लोकप्रियता मिळवणारे अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं आज वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतल्या अंधेरीमधील राहत्या घरी आज सकाळी ७.१० मिनीटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आयुष्यातील शेवटचे क्षण आपल्या कुटुंबासोबत घालवावेत, अशी त्यांची इच्छा होती. यासाठीच राहत्या घरीच त्यांच्यावरील उपचारासाठी एका रूग्णालयाप्रमाणेच व्यवस्था करण्यात आली होती.
अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे नातू विशाल शेखर यांनी माध्यमांना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले, “आजोबा झोपेत असतानाच त्यांचं निधन झालं. त्यांना कोणत्याच प्रकारचा आजार नव्हता. गेल्या काही दिवसांपासून अंगावर भरपूर ताप असल्याने त्यांना गुरूवारी जुहू स्थित क्रिटी केअर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण त्यानंतर ताप उतरला आणि आम्ही त्यांना एका दिवसांतच घरी आणलं.”
View this post on Instagram
यापुढे बोलताना नातू विशाल शेखर म्हणाले, “त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत रहायचं होतं, ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांना घरी आणलं.” तसंच अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांच्यावर उपचारासाठी घरातच एका रूग्णालयाप्रमाणे व्यवस्था कऱण्यात आली होती, असं चंद्रशेखर यांचा मुलगा अशोक शेखर यांनी सांगितलं.
चंद्रशेखर यांनी सुरवातीला त्यांनी एक ज्यूनिअर आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरवात केली. त्यानंतर ५० ते ९० च्या दशकात ‘गेटवे ऑफ इंडिया’, ‘बरसात की रात’, ‘कटी पतंग’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘नमक हलाल’, ‘डिस्को डान्सर’, ‘शराबी’, ‘त्रिदेव’ सारख्या चित्रपटात काम केलं आहे. 1998 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘रामायण’ या मालिकेत त्यांनी ‘आर्य सुमंत’ची भूमिका साकारली आणि ते घराघरात पोहोचले. ते या मालिकेतील सगळ्या ज्येष्ठ कलाकार होते. त्यावेळी त्यांचं वय ६५ इतकं होतं. खरं तर चंद्रशेखर वैद्य आणि रामानंद सागर यांची घट्ट मैत्री होती. रामानंद सागर यांच्या म्हणण्यावरून त्यांनी ‘रामायण’ मालिकेत काम केलं होतं.