सीआयडी सारख्या शोमधून घराघरात पोहचलेला अभिनेता आदित्य श्रीवास्त याने अनेक सिनेमांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सीआयडी या शोमधील त्याची इन्स्पेक्टर अभिजीत ही भूमिका मालिकेतील इतर भूमिकां एवढीच महत्वाची आणि प्रभावशाली होती. मात्र करोनाच्या काळात आदित्यला देखील आर्थिक संकटांचा सामना करावा लागल्याचा खुलासा त्याने नुकत्याच एका मुलाखतीत केला आहे.

करोनाच्या या महामारीचा फटका बॉलिवूडसह कलाक्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे अनेक कलाकारांचं मोठं नुकसान झालं. अनेक कलाकारांसोबतच तंत्रज्ञांना काम न मिळाल्याने आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं. इतरांप्रमाणे मलाही आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागल्याचं अभिनेता आदित्य श्रीवास्तव एका मुलाखतीत म्हणाला आहे.

तक्रार न करता पुढे जाणं गरजेचं

आदित्य म्हणाला, ““प्रत्येकाप्रमाणेच मी देखील या महामारीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना केला. मात्र सध्याच्या काळात आपल्याला एकत्र येऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. सर्व काही सुरळीत होई पर्यंत या कठीण काळात मार्ग काढण्यासाठी आता तक्रार न करता पुढे जाण्याची गरज आहे.” असं आदित्य म्हणाला.

नुकत्याच आलेल्या ‘वन रक्षक’ या सिनेमातून आदित्य एका महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमात त्याने एका वन अधिकाऱ्याची भूमिका  साकारली आहे. पवन कुमार शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय़. आदित्य सोबतच अभिनेता यशपाल शर्मा, फलक खान तसचं धिरेंद्र ठाकून असे कलाकार या सिनेमात आहे. हिमाल प्रदेशमधील एका सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे.

आदित्यला खरी ओळख सीआयडी शोमुळे मिळाली आहे. या शोमधील इन्स्पेक्टर अभिजीतच्या भूमिकेतून तो घराघरात पोहचला आहे. लवकच तो ‘हसीन दिलरुबा’ या सिनेमात एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. याच सोबत ‘ह्युमन’ या त्याच्या आगामी वेब सीरिजचं सध्या शूटिंग सुरू आहे.