Deepika Padukone Breaks Silence After Being Replaced From Kalki 2898 ad Sequel : दीपिका पादुकोणला प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या सिक्वेलमधून काढून टाकण्यात आले आहे. दीपिका पादुकोण काही दिवसांपासून चर्चेत आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी दीपिकाला आधी ‘स्पिरीट’ सिनेमातून काढलं. दीपिकावर ‘अनप्रोफेशनल’ असा आरोप लावण्यात आला होता. या सगळ्या चर्चांनंतर आता दीपिकाने एक खास फोटो पोस्ट केला असून त्याच्या कॅप्शनने लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये दीपिकाने पुष्टी केली की, ती ‘किंग’मध्ये शाहरुख खानबरोबर काम करणार आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामवर शाहरुख खानचा हात धरलेला एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये फक्त त्यांचे हात दिसतात, त्यांचे चेहरे दिसत नाहीत. या फोटोबरोबर दीपिकाने एक भावनिक कॅप्शन देखील लिहिलं आहे.
पोस्ट शेअर करताना तिने लिहिले, “जवळपास १८ वर्षांपूर्वी ओम शांती ओम शूटिंगवेळी शाहरुखने मला पहिली शिकवण दिली ती म्हणजे ‘कोणताही सिनेमा बनवतानाचा अनुभव आणि ज्या लोकांबरोबर तुम्ही तो बनवत आहात ते लोक त्याच्या यशापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. मी याच्याशी १०० टक्के सहमत आहे आणि तेव्हापासून माझ्या प्रत्येक निर्णयात मी हीच शिकवण लक्षात ठेवली आहे. कदाचित म्हणूनच आपण पुन्हा एकत्र आपला ६ वा सिनेमा बनवत आहोत. ‘किंग’चा पहिला दिवस.” पोस्टमध्ये दीपिकाने #King हा हॅशटॅग वापरला, ज्यामध्ये शाहरुख खान आणि ‘किंग’ दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा उल्लेख होता आणि “डे वन” लिहिले, जे दर्शवते की त्यांनी “किंग”चे शूटिंग सुरू केले आहे. दीपिकाच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे.
दीपिका पादुकोणने २००७ मध्ये आलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून शाहरुख खानबरोबर तिच्या बॉलीवूड कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिने त्याच्याबरोबर ‘हॅपी न्यू इयर’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दीपिका आणि शाहरुख खान जेव्हा जेव्हा मोठ्या पडद्यावर दिसले आहेत, तेव्हा तेव्हा हा चित्रपट यशस्वी झाला आहे. आता ते सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’मध्ये पुन्हा एकत्र दिसणार आहेत.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, ‘किंग’मध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, अर्शद वारसी, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, जयदीप अहलावत आणि अभय वर्मा देखील आहेत. ‘किंग’ व्यतिरिक्त, दीपिका ॲटलीच्या आगामी चित्रपट AA22xA6 मध्ये अल्लू अर्जुनबरोबर दिसणार आहे.