अभिनेता धनुष हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. विशेषकरून त्यानं तामिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. धनुषबद्दल अधिक सांगायचं झालं, तर तो सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई होता. (काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या व धनुष या दोघांनी घटस्फोट घेतला) रजनीकांत यांच्याप्रमाणेच धनुषनंही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आता त्याला इंडस्ट्रीत २३ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त त्यानं त्याच्या आगामी चित्रपट ‘कुबेरा’च्या म्युझिक लाँचच्या कार्यक्रमात भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्याच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबद्दल बोलताना तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

धनुष आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिकांद्वारे अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसह झळकला आहे. आता त्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत २३ वर्षं झाली असल्यानं त्यानं या कार्यक्रमात त्याच्या चाहत्यांप्रति असलेल्या भावना, तसेच या प्रवासात त्याच्याबद्दल नकारात्मक अफवा पसरवणाऱ्यांबद्दल तो व्यक्त झाला आहे. तो म्हणाला, “जेव्हा कठीण काळातून जात असतो आणि त्यामधून बाहेर येण्याचा मार्ग शोधत असतो तेव्हा मला कायम देव माझ्यामागे असल्याचं जाणवतं. त्यावेळी माझा प्रत्येक चाहता माझ्यासाठी मला त्या कठीण काळातून बाहेर येण्याचं मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक ठरतो. त्यामुळे तुम्हाला माझ्याबद्दल ज्या काही अफवा पसरवायच्या आहेत, त्या पसरवा. माझ्याबद्दल जे काही नकारात्मक बोलायचं आहे, ते बोला. दर वेळी माझा कुठलाही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीड महिना अगोदर माझ्याविषयी नकारात्मक प्रचार केला जातो. पण, तेव्हासुद्धा देव आणि चाहते मला यातून बाहेर काढतात.”

धनुष पुढे म्हणाला, “आता इथे उपस्थित असलेले सर्व लोक फक्त माझे चाहते नाहीत, तर माझे २३ वर्षांचे सोबती आहेत. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही माझ्याबद्दल काहीही अफवा पसरवू शकता तर हा तुमचा गैरसमज आहे.” अशातच ‘एक्स’वर धनुषच्या एका चाहत्यानं त्याचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्याखाली लिहिलं आहे, “जवळपास दोन मिनिटं ३० सेकंदांसाठी चाहते जल्लोषात ओरडत होते आणि त्यांनी धनुषला काही बोलूच दिलं नाही. तेव्हा तो भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले.”

दरम्यान, धनुषचा ‘कुबेरा’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडा, नागार्जुन हे कलाकारही झळकणार आहेत. शेखर कमुला दिग्दर्शित ‘कुबेरा’ चित्रपट २० जूनला रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.