Gutami Patil Video : आपल्या नृत्यकौशल्यानं सर्वांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. ‘सबसे कातिल, गौतमी पाटील’ अशी ओळख असलेली गौतमी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर गौतमीचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर गौतमी तिचे अनेक फोटो, तसेच लावणीचे व्हिडीओ शेअर करीत असते.
गौतमी सोशल मीडियावर अचानक लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे तिचा डान्स. सुरुवातीला गौतमीचे अश्लील हावभाव असलेल्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. त्यामुळे तिला प्रचंड टीका, ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. मात्र, हे सगळं सहन करून तिनं आता तिच्या नृत्यशैलीत बदल केला आहे.
गौतमीनं तिच्या सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमुळे गौतमी सोशल मीडियावर अनेकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. गौतमीनं नुकतीच वारकऱ्यांची सेवा केली आहे आणि या खास क्षणांचा व्हिडीओ तिनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गौतमी पाटील इन्स्टाग्राम पोस्ट
या व्हिडीओमध्ये गौतमी वारकऱ्यांबरोबर भजन-कीर्तन करण्यात दंग झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच तिनं वारकऱ्यांना खाऊवाटपही केलं असल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर तिनं आरतीही केली. त्याशिवाय बच्चेकंपनीसह काही खास क्षण एन्जॉयही केले. गौतमीची ही कृती सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरली आहे. अनेकांनी गौतमीचा हा व्हिडीओ पाहून कमेंट्समध्ये तिच्यावर स्तुतिसुमनं उधळले आहेत.
गौतमी पाटीलच्या कृतीचं कौतुक
‘राम कृष्ण हरी, माय माऊलींची सेवा’ अशी कॅप्शन देत गौतमीनं हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही अनेक कमेंट्स व्यक्त केल्या आहेत. “वाह! तुमची भक्ती पाहून मनाला खूप आनंद झाला”, “संस्कृती जपतीये”, “राम कृष्ण हरी”, खूप छान गौतमी”, “संस्कृती जोपासणारी गौतमी” अशा अनेक कमेंट्सद्वारे तिचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, डान्स शो करणाऱ्या गौतमीनं नुकतीच छोट्या पडद्यावरही एन्ट्री केली आहे. झी मराठीच्या ‘देवमाणूसमधला अध्याय’ या मालिकेत तिनं खास लावणी सादर केली. त्यात ती लावणीसह अभिनय करतानाही दिसली. त्याशिवाय गौतमी स्टार प्रवाहवरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातही सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं.