अभिनेते कमल हासन यांची मुलगी अभिनेत्री अक्षरा हासनने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. अभिनेत्रीने तिच्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचं यामधून सांगितलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिचं व तिच्या कुटुंबीयांचं नाव वापरून ते चित्रपटांची निर्मिती करत असल्याची खोटी माहिती पसरवली जात असल्याचं तिने म्हटलं आहे.

अक्षरा हासन सोशल मीडियावर पोस्ट करत इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांना सावध करत म्हणाली, “इब्राहिम अखतर नावाची एक व्यक्ती माझं व माझ्या कुटुंबीयांचं नाव वापरून आम्ही काही चित्रपटांची निर्मिती करत आहोत आणि आमचं उटीमध्ये ऑफिसही असल्याचं सांगत आहे. पण, या सर्व अफवा खोट्या आहेत आणि आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. आम्ही यावर कायदेशीर कारवाई करत आहोत, त्यामुळे तुम्हीसुद्धा याबाबत सावध राहा व अशा कोणत्याही गोष्टीला पाठिंबा देऊ नका.” अक्षरा व हासन कुटुंबीयांचं नाव वापरून खोटी अफवा पसरवणाऱ्याविरोधात अभिनेत्री कायदेशीर कारवाई करणार असल्याचं तिने या पोस्टमधून म्हटलं आहे. यावेळी तिने इंडस्ट्रीतील तिच्या सहकाऱ्यांनासुद्धा याबाबत माहिती देत या प्रकरणातील संबंधित व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन केलं आहे.

अक्षरा हासनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्रीने २०१५ साली आलेल्या आर बाल्की यांच्या ‘शमिताभ’ चित्रपटातून पदार्पण केलं आहे. परंतु, तिने तिचे वडील कमल हासन व बहीण श्रुती हासनप्रमाणे अद्याप इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलेलं नाही. २०२२ साली अभिनेत्री ‘अच्छम मॅडम नानम पायिरप्पू’ या तामिळ चित्रपटात झळकली होती, तर लवकरच ती ‘अग्नि सिरागुगल’ या चित्रपटातून झळकणार आहे. अशातच अभिनेते कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपट काल ५ जूनला प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमल हासन त्यांनी तेलुगू भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हासन कुटुंबीयांबद्दल बोलायचं झालं तर अभिनेते कमल हासन यांना श्रुती हासन व अक्षरा हासन अशा दोन मुली आहेत. वडिलांप्रमाणे या दोघींनीही अभिनयक्षेत्र निवडलं. श्रुती हासन हिने दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलीवूडमधील चित्रपटांतही काम केलं आहे, त्यामुळे श्रुती ही दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, तर अक्षरा हासनही वडील व बहिणीप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करू पाहत आहे.